Pimpri: रेडझोनमधून वगळल्यानंतर महिन्याभरात औद्योगिकनगरीत वाढले 1568 रुग्ण

Within a month after being excluded from the redzone, the industrial city grew to 1568 patients

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळून आज 22 जून रोजी एक महिना पूर्ण झाला आहे. शहराला रेडझोनमधून वगळण्यापर्यंत म्हणजेच 22 मे पर्यंत शहरात कोरोनाचे केवळ 265 रुग्ण होते. 22 मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळल्यापासून महिन्याभरात तब्बल 1568 रुग्ण वाढले आहेत. आत्तापर्यंत औद्योगिकनगरीतील रुग्ण संख्या 1833 वर पोहोचली आहे.

राज्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात सापडला होता. 10 मार्च रोजी एकाचदिवशी शहरातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते.  त्यानंतर एप्रिलपासून रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले. 10 मार्च ते 22 मे पर्यंत शहरातील रुग्ण संख्या 265 वर जाऊन पोहोचली होती.

रुग्ण वाढ होत असतानाच शहराला 22 मे रोजी रेडझोनमधून वगळण्यात आले. शहर नॉन रेडझोन म्हणून जाहीर करण्यात आले. शहराला रेडझोनमधून वगळल्याने महापालिकेने विविध सुविधा सुरु केल्या.

बाजारपेठा, दुकाने, कंपन्या सुरु करत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला. परिणामी, नागरिकांची बाहेर वर्दळ वाढली आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसून आले नाही.

परंतु, निर्बंध शिथिल करताच रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होवू लागली. बघता बघता कोरोनाने संपुर्ण पिंपरी-चिंचवड शहराला विळखा घातला.

सुरुवातीला सोसायटीत आढळलेल्या कोरोनाने  मध्यमवर्गीय वस्तीतून झोपडपट्यांमध्ये शिरकाव केला. शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या चिंचवड स्टेशन येथील आंनदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे. दापोडी, अजंठानगर येथील झोपडपट्टीत देखील कोरोनाने शिरकाव केला.

रेडझोनमधून वगळ्यापासून शहरात झपाट्याने रुग्ण वाढ होऊ लागली. ही रुग्ण वाढ सुरुच आहे. शहराला रेडझोन वगळलेल्या आज एक महिना पूर्ण झाला आहे. या महिन्याभरात तब्बल 1568 नवीन रुग्ण सापडले आहेत.

आत्तापर्यंत औद्योगिकनगरीतील रुग्ण संख्या 1833 वर पोहोचली आहे. महिनाअखेरपर्यंत शहरातील अडीच ते तीन हजारापर्यंत जाईल असा प्रशासनाचा अंदाज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.