PMPML : पीएमपीएमएलच्या पास योजनेला दिव्यांगांसाठी मुदतवाढ; ऑनलाईन पद्धतीने अर्जाचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत (PMPML) दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत “दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएमएलचे मोफत बसपास देणे” आणि “महानगरपालिका हद्दीतील 60 वर्षापुढील अंध व्यक्तीच्या सोबतीस असणा-या व्यक्तीस बस प्रवासाचा मोफत पास” या दोन योजनांअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 15  ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणा-या गरजूंनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. 

महापालिकेच्या वतीने समाज विकास विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत विविध योजना कार्यान्वित आहेत. महानगरपालिका हद्दीमध्ये राहणा-या दिव्यांग नागरिकांना तसेच महानगरपालिका हद्दीतील 60 वर्षापुढील अंध व्यक्तीच्या सोबतीस असणा-या व्यक्तीला सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता पीएमपीएमएलचे मोफत बसपास देण्याची योजना राबविली जाते.

Pimpri Chinchwad RTO : प्रवासी बसेसचे रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम

यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज स्विकृतीची मुदत दि. 31 जून पर्यंत होती. ही मुदत आता 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असून या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणा-या गरजूंनी ऑनलाईन  पद्धतीने अर्ज करावेत, सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकृती उपलब्ध करण्यात आलेली आहे.

जुन्या पासधारकांनी त्यांच्याकडील जुने मोफत बसपास कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुणे-मुंबई रोड, पिंपरी या ठिकाणी जमा करावेत, दिव्यांग नागरीकांनी (PMPML) मोफत बसपासचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या मुदतीतच ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा, असे आवाहन समाज विकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी केले आहे.

या दोन्ही योजनांचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी योजनेच्या अटी व शर्तीनुसार आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती उपलब्ध करण्यात आली असल्याचेही समाज विकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.