PMPML News : पीएमपीएमएलच्या सक्षमीकरणासाठी ‘पीएमपीएमएल प्रवासी मित्र’ उपक्रम

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (PMPML News) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या संकल्पनेतून पीएमपीएमएलमध्ये जागरूक पुणेकरांचा लोकसहभाग वाढविण्यासाठी व पीएमपीएमएलच्या सेवेबाबत नागरिकांकडून अभिप्राय व सूचना जाणून घेण्यासाठी ‘पीएमपीएमएल प्रवासी मित्र’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

पीएमपीएमएलच्या सक्षमीकरणासाठी लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा घटक असून या लोकसहभागातून पीएमपीएमएलला प्रवासीभिमुख सेवा देण्यासाठी मदत होणार असून त्यासाठी पीएमपीएमएल प्रवासी मित्र हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात येत आहे.

पीएमपीएमएल प्रवासी मित्र या अभिनव उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पीएमपीएमएलकडून ओळखपत्र देण्यात येईल. या ओळखपत्रावर बस प्रवासाकरिता कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. परंतु प्रवासी मित्रांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून 10 पीएमपीएमएल प्रवासी मित्रांची निवड करून त्यांना पीएमपीएमएलच्या वर्धापनदिनी १ वर्षाचा मोफत पास देण्यात येईल.

पीएमपीएमएल प्रवासी मित्र बनण्यासाठी [email protected] या मेल आयडीवर (PMPML News) संपूर्ण नाव, पत्ता, व्यवसाय, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, रंगीत फोटो आयडेंटिटी साईज, प्रवासी मित्र म्हणून विनामोबदला काम करण्यास तयार असल्याचे संमतीपत्र पाठवा. नागरिकांच्या सहभागातून पीएमपीएमएल सेवा सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात आले आहे.

पीएमपीएमएल प्रवासी मित्र या बाबींची माहिती पीएमपीएमएलकडे देऊ शकतात

  • ड्रायव्हर/कंडक्टर यांचे वर्तन
  • सुस्थितीत नसलेले बसथांबे
  • नवीन बसमार्गांबाबतच्या सूचना
  • बसशेडची आवश्यकता
  • पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची चांगली व उल्लेखनीय सेवा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.