PMRDA : म्हाळुंगे माण नगर योजनेला मिळाली पर्यावरण परवानगी!

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत (PMRDA) कार्यान्वित म्हाळुंगे माण नगररचना योजना क्रमांक 1 करिता राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचे पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाची नुकतीच पर्यावरण मंजुरी मिळाली आहे.

म्हाळुंगे माण नगररचना योजनेच्या प्रकल्प आराखडाचे विकसनासाठी पर्यावरण मंजुरी मिळाली आहे. ही नगर रचना योजना 250.50 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित असून या नगररचना योजनेला शासनाकडून प्राथमिक मंजुरी डिसेंबर 2019 मध्येच मिळालेली असून सध्या नदीच्या पूररेषेतील बदलामुळे प्रथम फेरबदलाची कार्यवाही सुरु आहे.

प्रथम फेरबदलाची प्रारूप नगर रचना योजना 30 डिसेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार महानगर आयुक्त यांनी मंजूर केली. त्यावर सूचना हरकती मागवून लवाद यांनी सुनावण्या पूर्ण केल्या आहेत. लवकरच ही योजना शासनाच्या अंतिम मंजुरी साठी शासनाकडे सादर केली जाईल.

या नगर रचना योजनेच्या प्रकल्प आराखड्याचे विकसनासाठी शासनाच्या पर्यावरण विभागाची मान्यता आवश्यक होती. या (PMRDA) साठी प्राधिकारणाच्या वतीने पर्यावरण विभागाचे पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणासमोर सादरीकरण करण्यात आले त्यास अनुसरून राज्य शासनाने पर्यावरण विषयक ना हरकत प्रदान केली आहे.

या नगर रचना योजना मध्ये विद्युत उपकेंद्र, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, वाहनतळ, स्मशान व दफनभूमी,सांस्कृतिक समुदाय केंद्र, इत्यादी सोयी –सुविधा भूखंडा करिता 14.69 हे. जागा प्रस्तावित आहे. तसेच योजनेमध्ये बगीचा,खेळाचे मैदान,लहान मुलांचे मैदान,नदी संरक्षण क्षेत्र, ओपन स्पेस, हरित पट्टा इत्यादी भूखंडा करिता 33.67 हेक्टर जागा प्रस्तावित केलेली आहे.

नगररचना योजनेसाठी पुणे महानगरपालिकाच्या वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार आहे त्यासाठी पुणे महापालिकेसोबत संयुक्त कार्यवाही केली जाणार आहे.

तसेच 32 दशलक्ष लिटर (MLD) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (STP) विकसित करण्यात येणार आहे. नगररचना योजने मधून वाहणाऱ्या नाल्याचे सुशोभीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात रस्त्यात येणारी 141 झाडे तोडण्यात येणार असून 35 झाडे स्थलांतरित करण्यात येणार आहे.

Maval : ग्रामपंचायत निवडणूक; 151 जागांसाठी 217 उमेदवार रिंगणात

तसेच संपूर्ण प्रकल्पात 13630 नवीन झाडे लावण्यात येणार आहे. पर्यावरण परवानगी मिळाल्यामुळे नगररचना योजनेच्या विकासाच्या कामांना गती मिळाली आहे. सद्यस्थिती मध्ये 3 रस्त्यांची कामे आणि नाल्यावर 5 पुलांचे कामे सुरु आहेत.

म्हाळुंगे माण नगररचना योजनेस राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने पर्यावरण विषयक परवानगी दिली असल्याने योजनेच्या विकास कामांना निश्चित गती मिळेल, असा विश्वास आयुक्त राहुल महिवाल यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.