PMRDA : पीएमआरडीए केवळ बांधकाम परवानग्या देणारे प्राधिकरण न राहता, विकास करणारे प्राधिकरण व्हावे – माजी नगरसेवकांनी व्यक्त केली अपेक्षा

एमपीसी न्यूज – पीएमआरडीए ही केवळ बांधकाम परवानगी देणारी संस्था ( PMRDA) झाली आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये एकही विकासाचे प्रकल्प नजरेत येतील असं काम झालेलं नाही. एमएमआरडीए ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीने पीएमआरडीएला काम करण्याच्या संदर्भात आपण सूचना द्याव्यात. बांधकाम परवानग्या नगर विकास सहाय्यक संचालक अथवा सहसंचालक पुणे विभाग यांच्या स्वाक्षरीने आणि माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या नावाने देण्यात याव्यात. म्हणजे केवळ परवानग्या देणारे प्राधिकरण न राहता विकास करणारे प्राधिकरण हे होईल, असे माजी नगरसेवकांनी म्हटले आहे. 
या संदर्भातील निवेदन माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी आज मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित  पवार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे  पीएमआरडीए यांची जमीन व मालमत्ता विभाग जाहीर सूचना मौजे भांबुर्डा शिवाजीनगर तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील फायनल प्लॉट क्रमांक 19 व 20 क्षेत्र 7  हेक्टर 14 आर् दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने देण्याबाबत ई लिलाव जाहीर करीत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील शासकीय दूध डेअरीची जागा शासनाने पीएमआरडीए ला हस्तांतरित केली होती. मध्यंतरी पीएमआरडीएने या शासकीय दूध डेअरी मधील सर्व मशिनरी लिलावाद्वारे विकली आहे.
पीएमआरडीए ने ही जागा स्वतः विकसित करणे आवश्यक होते. परंतु, तसे न करता त्याने त्यांना मोफत मिळालेली जागा दीर्घ भाडेपट्ट्याने देण्यासंबंधी जाहीर प्रकटन जाहिरात दिली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत क्रीडांगणाचे आरक्षण उठवून त्या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती दूध संघ कात्रज यांना ॲप्रोप्रिएट ॲथोरिटी समुचित प्राधिकरण म्हणून नेमण्याच्या बाबत प्रक्रिया सुरू आहे.पीएमआरडीएला या जागेची आवश्यकता नसेल तर ही  जागा शासनाने पीएमआरडीएकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती दूध संघ कात्रज यांना दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने देऊन आरक्षणाची जागा आरक्षित ठेवून त्या भागातील नागरिकांची सोय होईल आणि या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती दूध संघ कात्रज यांचे देखील काम होईल, अशा प्रकारचा निर्णय करावा. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एका बड्या व्यावसायिकासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे, असा आरोप माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी निवेदनात केला ( PMRDA) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.