Nigdi News : ‘योग्य मार्गदर्शन मिळाल्यास बालके देशाची शक्ती बनू शकतात’ – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज – भारतात सर्वात अधिक बालके आहेत. ही बालके देशाची शक्ती बनू शकतात आणि समस्या देखील. त्यामुळे आपले प्रयत्न महत्वाचे आहेत. बालकांना योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते देशाची शक्ती बनू शकतील असा विश्वास पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्या बालस्नेही पोलीस कक्षाचे उदघाटन निगडी पोलीस ठाण्याच्या आवारात बुधवारी (दि. 15) करण्यात आले, यावेळी आयुक्त कृष्ण प्रकाश बोलत होते.

कार्यक्रमासाठी अपर पोलीस डॉ. आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, शंकर आवताडे, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका शर्मिला बाबर, अतुल शितोळे, होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनचे कॅरोलिन ओज्वा द वॉल्टर, बी जी शिर्के कंपनीचे श्री लावंड, श्री चव्हाण आदी उपस्थित होते.

बालकांचे हक्क आणि त्यांच्या समस्यांबाबत काम करण्यासाठी बालस्नेही पोलीस कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याचे वातावरण बालस्नेही करणे, भरकटलेल्या बालकांवर चांगले संस्कार करण्यासाठी हा कक्ष प्रयत्न करणार आहे. पुढील काळात दिघी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातही असे बालस्नेही पोलीस कक्ष तयार केले जाणार आहेत.

दरम्यान, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “बालगुन्हेगारांना पाप आणि पुण्य यातील फरक माहिती नसतो. परिणामांची जाणीव नाही, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नाही, गंभीर मानसिक आजार अशा तीन प्रकारचे बालगुन्हेगार असतात. हे सर्व मानसिक आजाराची लक्षणे आहेत. त्यासाठी योग्य उपचार करणे आवश्यक आहेत. बालगुन्हेगारीकडे वळणाऱ्या बालकांच्या घरातील परिस्थिती, बालकांच्या गरजा काय आहेत अशा अनेक बाबी तपासणे गरजेचे आहे. अनाथ मुले, रस्त्यावर वस्तू विकणारी मुले यांच्याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे, त्यासाठी बालस्नेही पोलीस कक्ष हे पोलिसांकडून पाहिले पाऊल आहे.

आयुक्त पुढे म्हणाले, “पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात असे कक्ष तयार केले जाणार आहेत. या कक्षात येणा-या मुलांना कुठल्याही प्रकारचे दडपण येता कामा नये. या कक्षात काम करणारे पोलीस आणि अन्य अधिकारी सध्या पोशाखात असावेत, त्यांची भाषा सभ्य असावी, त्यांना कायद्याची माहिती असावी, मुलींशी बोलण्यासाठी महिला अधिकारी असायला हवी, माहिती फलक असायला हवेत. केवळ स्वतंत्र खोली बनवून उपयोग नाही तर तिथे काम करणाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ‘होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन’च्या वतीने पिंपरी चिंचवड मधील सर्व बालस्नेही पोलीस कक्षात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

भारतात सर्वात अधिक बालके आहेत. ही बालके देशाची शक्ती बनू शकतात आणि समस्या देखील. त्यामुळे आपले प्रयत्न महत्वाचे आहेत. सुधारगृहात पाठवले जाणाऱ्या मुलांचे योग्य मानसिक विश्लेषण व्हायला हवे. अनेक संस्था अल्पवयीन मुलांच्या नावाखाली केवळ परदेशी मदत निधी हडपतात. याकडे न्यायव्यवस्थेने लक्ष देणे आवश्यक आहे, असेही आयुक्त म्हणाले.

अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे म्हणाले, “सर्व पोलीस स्टेशन नागरिक स्नेही करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलीस स्टेशन नागरिकांना सेवा देणारी केंद्रे व्हायला हवी. पोलिसांचे वर्क कल्चर बदलावे लागेल. या सगळ्याची सुरुवात आपल्याला करावी लागेल. फक्त पोलीस ठाण्यातील वातावरण बदलून उपयोग नाही. त्यासोबतच गुन्हे प्रवण क्षेत्रावर पोलीस हजर पाहिजेत. आपण आपल्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी आपण सगळ्यांनी सुरुवात करायला हवी. नागरिकांनी पोलिसांचे कान आणि डोळे होऊन काम करायला हवे.”

उपायुक्त मंचक इप्पर म्हणाले, “लहान मुले ही देशाचे भविष्य असतात. एक लाख लोकांमध्ये 21 बालके गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसत आहे. याला पायबंद घालण्यासाठी वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे. मुलांवर गुन्हेगाराचा शिक्का लागून मुलांचे आयुष्य उध्वस्त होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस ठाण्यातील वातावरण मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करू शकते, त्यामुळे बालस्नेही पोलीस कक्षाची संकल्पना सुरू केली आहे. अल्पवयीन मुलांना समाजाच्या योग्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे समुपदेशन केले जात आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणजे बालस्नेही पोलीस कक्ष आहे.”

होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या कॅरोलिन ओज्वा द वॉल्टर म्हणाल्या, मागील एक महिन्यापासून पिंपरी चिंचवड पोलिसांसोबत आम्ही काम करत आहोत. आयुक्तांनी या संकल्पनेला स्वीकारल्याने आनंद होत आहे. महिला व बालकल्याण विभाग, पोलीस आणि अन्य विभाग एकत्रितपणे बालकांसाठी काम करत आहेत. भारताची 41 टक्के लोकसंख्या 18 वर्षाच्या खालील वयोगटातील आहे. अल्पवयात लग्न होणे, गुन्हेगारीकडे वळणे अशा अनेक समस्या बालकांबाबत येत आहेत. बालकांच्या अधिकारांप्रति सजग होण्याच्या उद्देशाने या बालस्नेही पोलीस कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस, डॉक्टर, वकील असे अनेक घटक एकत्र काम करणार आहेत. बालके आणि त्यांचे पालक त्यांच्या अडचणी घेऊन पोलीस ठाण्यात यावेत, त्यांच्या तक्रारी नोंदवल्या जाव्यात, हे या बालस्नेही पोलीस कक्षाचे उद्दीष्ट आहे.”

महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये निवड झाल्याबद्दल पोलीस कर्मचारी परवीन पठाण यांचा कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशनच्या वतीने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या रक वर्षाच्या शहरातील कारकीर्दीबद्दल सत्कार करण्यात आला.

सहाय्यक आयुक्त सागर कवडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी आभार मानले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.