Sarsenapati Hambirrao : ‘मुळशी पॅटर्न’च्या यशानंतर प्रविण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर रिलीज

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग हळूहळू ओसरत असताना चित्रपटसृष्टी पूर्वपदावर येत आहे. मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर सुरू झाले आहेत. मराठीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच चित्रपटाचा रक्त उसळवणारा टीझर रिलीज झाला आहे.

प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश संपादन केले. यामुळे त्यांचा पुढचा चित्रपट कोणता? याबद्दल रसिकांच्या मनात उत्सुकता होती, तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

शनिवारी सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ च्या टीझरने चित्रपटाबद्दल उत्कंठा अधिकच वाढली आहे. या टीझर मधून चित्रपटाची भव्यता तर लक्षात येतेच पण चित्रपटातील संवाद आणि ऍक्शन सिक्वेन्स जबरदस्त लक्षवेधी असणार आहेत याचाही अंदाज येतो. प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसत आहे.

मराठीतील हँडसम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे उघड झाले होते, तर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार? या प्रश्नाचे उत्तर टिझर मध्ये मिळाले असून मुख्य भूमिकेत दमदार अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे दिसणार आहेत.

संदीप मोहिते पाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित आणि शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य, ऐतिहासिक चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येणार आहे.

टिझर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा – 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.