Pune : गुन्हे शाखा युनिट चार व अन्न व औषध प्रशासनाचा पनीर दुकानावर छापा; 2.5 लाखांचे 1410 किलो पनीर सील

एमपीसी न्यूज – अन्न व औषध प्रशासन व गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी पर्वती येथील होलसेल व रिटेल पनीर विक्रीच्या दुकानावर छापा टाकून 2.5 लाख रुपयांचे 1410 किलो पनीर सील केले आहे.

पोलीस हवालदार साळुंके यांना पर्वती येथील मित्र मंडळ चौक विष्णू सोसायटी शॉप नंबर 9 येथे भेसळ युक्त व कमी दर्जाचे पनीर विक्री करीत होत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला माहिती देऊन त्यांच्या मदतीने या दुकानात छापा टाकण्यात आला. यावेळी तिथे हरीकृष्ण मुरलीधर शेट्टी हा इसम पनीरची विक्री करीत होता. या दुकानाला कोणतेही नाव नव्हते. तसेच पनीर विक्रीकरिता लागणा-या अन्न व औषध प्रशासनाचा परवानाही त्यांच्याकडे नव्हता. त्यांच्याकडे असलेल्या पनीर या अन्न पदार्थाची माहिती घेतली असता ती प्रथमदर्शनी दिलेल्या दर्जानुसार आढळून आली नाही.

दुकानातील सर्व पनीरचे वजन 1 हजार 410 किलो इतके भरले. त्याची किंमत दोन लाख 53 हजार रुपये इतकी होती. या पनीरचे काही सॅम्पल तपासणी करिता अन्न व औषधे प्रशासनाने ताब्यात घेऊन उर्वरित पनीर शीतगृहात सुरक्षित ठेवून ते सील केले. हे पनीर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून आणले आहे, अशी माहिती दुकानदाराने दिली. पुढील कारवाई अन्न व औषधे प्रशासन करीत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.