Pune : आयुष्याची दोरी चायनीज मांजापेक्षा अधिक बळकट होती म्हणून…….

एमपीसी न्यूज- चायनीज मांज्यावर बंदी घातलेली असतानाही या मांजाची सर्रासपणे विक्री होताना दिसते. पतंगबाज मंडळी देखील कोणताही विचार ना करता या मांजाचा वापर करून पतंग उडविण्याचा आनंद घेतात. पण या मांजामुळे आजपर्यंत अनेक पक्षी आणि माणसांना भयंकर इजा पोहोचलेली आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ‘तुमचा होतो खेळ, पण आमचा जातो जीव’ असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. या चायनीज मांजामुळे ज्यांचे प्राण अक्षरशः ‘कंठाशी’ आले होते त्या डहाणूकर कॉलनीमध्ये राहणाऱ्या प्रिया शेंडे यांचा मागच्या वर्षीचा थरारक अनुभव त्यांच्याच शब्दात. केवळ त्यांच्या आयुष्याची दोरी चायनीज मांजापेक्षा अधिक बळकट होती म्हणून, अन्यथा …….

संध्याकाळी मी आणि पुतणी सायली ऍक्टिवावर गणंजय सोसायटीच्या जवळ डीपी रस्त्याने जात होतो..अचानक उजव्या बाजूने समोर दोरा हलला…एका क्षणात धोका लक्षात आला आणि मी गाडी डावीकडे थांबवायला घेईपर्यंत त्या दोऱ्याने त्याचं काम केलं आणि माझा गळा चिरला. काही कळायच्या आत टपकणाऱ्या माझ्याच रक्ताने कपडे पूर्ण ओले झाले आणि प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत सायली म्हणजे माझ्या पुतणीने रिक्षा पकडून मला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणलं…उपचार झाले तेंव्हा त्या जखमेला 5,6 टाके पडले होते आणि प्रचंड वेदना होत होत्या. हे सगळं करून घर गाठलं. अत्यंत भयानक प्रसंग ! तो दोरा कुठून आला, कसा आला काही कल्पना नाही..

मांज्यावर बंदी असताना असले जीव घेणे मांजे विकले कसे जातात? पालक किंवा तरुणाई ते विकत कशाला घेते ? इतक्या रहदारीच्या ठिकाणी पतंग का उडवले जातात ? हे न सुटणारे प्रश्न आहेत…या सगळ्याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे …मांज्यांवर बंदी यायलाच पाहिजे…कारण एखाद्या माणसाचा काही दोष नसताना त्याने अशा प्राणघातक प्रसंगांना बळी पडायचे का ? पुण्यासारख्या शहरात इतकी गर्दी वाढलीय की आधीच जीव मुठीत घेऊन फिरावं लागतं. त्यात जानेवारी महिना आला की जास्त काळजी घेऊन फिरावं लागतं… अरे, स्वतः सुरक्षित राहा आणि लोकांनाही राहू द्यात ना ?? असा उद्विग्न सवाल प्रिया शेंडे यांनी केला आहे.

मी जे माझ्यापरीने भोगलं त्याची आठवण म्हणून आणि जनजागृती म्हणून हा लेख लिहितेय…कदाचित काही लोकांना प्राणही गमवावा लागला असेल त्यामुळे सावधान !!!!

– प्रिया शेंडे, डहाणूकर कॉलनी, कोथरूड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.