Pune: आमदार माधुरी मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश, बिबवेवाडीत कोरोना उपचार केंद्र सुरू

Pune: Corona treatment center started in Bibwewadi अकरा खाटांवर व्हेंटिलेटरची सुविधा देण्यात येणार आहे. साठ खाटांवर ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे.

एमपीसी न्यूज – बिबवेवाडीतील राज्य कामगार विमा योजनेच्या (ईएसआयसी) रुग्णालयात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठीचे केंद्र सुरू करण्यात आले. यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, बांधकाम समितीचे सभापती प्रमोद काकडे , मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ईएसआयसीचे आरोग्य अधिकारी सुनील झोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार बापट म्हणाले, ‘कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे परिस्थिती गंभीर झालेली आहे. अशावेळी रुग्णांवर मानवतेच्या दृष्टिकोनातून उपचार करणे आवश्यक आहे.

या रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी केंद्र शासनाची सर्वतोपरी मदत मिळवून देऊ. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबरोबर पुरेशा प्रमाणात डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी उपलब्ध करून देऊ.’

आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘या रुग्णालयात सुरुवातीला बाह्य रुग्ण विभाग सुरू होता. आता उपचारांसाठी ३०० खाटा उपलब्ध होऊ शकतात. पहिल्या टप्प्यात ११० खाटांच्या क्षमतेचे कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात येत आहे.

11 खाटांवर व्हेंटिलेटरची सुविधा देण्यात येणार आहे. साठ खाटांवर ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे. सध्या एकाएका खाटेसाठी रुग्णांचा संघर्ष सुरू असताना या केंद्राची उपयुक्तता अधिक आहे. नजिकच्या काळात रुग्णालय पूर्ण क्षमतेने कायान्वित होईल यासाठी पाठपुरावा करणार आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.