Pune Crime News : इंदापुरात शेततळ्यात विषारी औषध टाकून पाच टन मासे मारले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – इंदापूर तालुक्यातील शेलार पट्टा गावात एका शेततळ्यात अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकून तब्बल पाच टन मासे मारल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेत शेतकऱ्याचे तब्बल पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शेतकरी सुखदेव केवटे यांनी इंदापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी शेताला पाणी पुरवण्यासाठी शेततळी तयार केली आहेत. शेतीला जोड धंदा म्हणून शेतकऱ्यांनी या शेततळ्यात मत्स्यबीज सोडले आहे. मात्र हा मत्‍स्‍यव्‍यवसाय अनेकांना खटकत असल्याचे मागील काही दिवसात घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे.

सुखदेव केवटे यांच्या शेतातही दोनशे बाय शंभर लांबी-रुंदीचे शेततळे आहे. या शेततळ्यात त्यांनी आठ महिन्यांपूर्वी तीस हजार मत्स्यबीज सोडले होते. त्यातील मासे आता चांगलेच मोठे झाले होते. परंतु रविवारी रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने त्याच्या शेततळ्याचे विषारी औषध टाकल्यामुळे पाच टनाहुन अधिक माशांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. केवटे सकाळी माशांना खाद्य देण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेत संबंधित शेतकऱ्याचे तब्बल पाच लाखाचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.