Pune Crime News : हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणी खडकीतील नगरसेवकासह सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुण्याच्या औंध परिसरात काही दिवसांपूर्वी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या गाडीने अपघात झाल्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातून हर्षवर्धन जाधव यांनी मारहाण केली म्हणून त्यांच्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात आता न्यायालयाच्या आदेशाने खडकी कॉन्टॅमेंट बोर्डाचे नगरसेवक मनीष आनंद यांच्यासह 7 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा व विनयभंग आणि इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्या सोबत असणाऱ्या 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात अमन चड्डा, करण चड्डा, ममता चड्डा, मजय चड्डा, मनीष आनंद, मोटारसायकलवर असलेले दोन अनोळखी व्यक्ती व गर्दीत असणारा एक अशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की 14 डिसेंबर रोजी, औंध परिसरात हर्षवर्धन जाधव यांच्या कारचा दरवाजा उघडला असता आरोपींनी मुद्दाम त्यांच्या गाडीला धडक मारली. त्यानंतर आरोपींनी मुद्दामून आरडाओरडा केला आणि हर्षवर्धन जाधव यांच्या सोबत असणाऱ्या महिलेचा विनयभंग केला. असे फिर्यादीत म्हटले आहे.

हा प्रकार झाल्यानंतर फिर्यादी महिला ही हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत जात असताना आरोपींनी त्यांची कार दुचाकी आडवी लावून थांबवली. तसेच जाधव यांना खाली ओडून मारहाण करत शिवीगाळ केली. त्यांना रॉडने बेदम मारहाण केल्याचे म्हटले आहे. तर फिर्यादी यांना आरोपींनी या गोंधळात घेऊन कारमध्ये बसवले तसेच आरोपी मनीष आनंद व अमन आणि करणं यांनी त्यांच्यावर गाडीत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना मारहाण करून त्यांचा आयफोन तोडला तसेच कारचे नुकसान केले असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान हा प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी प्रथम हर्षवर्धन जाधव व फिर्यादी यांच्यावर ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी फिर्यादी यांनी तक्रार केली होती. मात्र त्यात पोलिसांनी कारवाई केली नाही. यानंतर फिर्यादी यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आता गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.