Pune Crime News : आईनेच नशा करून चिमुरड्याला पिशवीत कोंबले; दामिनी पथकामुळे वाचले बाळाचे प्राण

एमपीसी न्यूज – नवऱ्याने दुसरं लग्न केल्यामुळे संतापाच्या भरात महिलेने नशा करुन बाळाला पिशवीत घातले होते. त्यावर गोधडी टाकून महिला काल सकाळी दहाच्या सुमारास रस्त्याने फिरत होती. हडपसरमधील नागरिकांना ही महिला दिसल्यानंतर त्यांनी पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

त्यानंतर नियंत्रण कक्षाने हडपसर मुंढवा दामिनी मार्शलला घटनास्थळी रवाना होण्याचे सांगितले. त्यानुसार दामिनी नीलम पाचंगे आणि सारिका घाडगे अवघ्या 10 मिनीटांमध्ये मंतरवाडी चौकात पोहचल्या. त्यावेळी त्यांना महिला दिसून आली. त्यांनी तिच्या हातातील पिशवी घेत गोधडी बाजूला केली. त्यावेळी दीड महिन्याचे बाळ पिशवीत गुदमरल्याने टाहो फोडत होते.

दामिनी नीलम आणि सारिका यांनी क्षणाचाही वेळ न लावता बाळाला पिशवीतून बाहेर काढले. त्याला हाताने स्वच्छ करीत मायेची ऊब दिली. त्यानंतर महिलेलसह बाळाला हडपसर पोलीस ठाण्यात नेले. परिसरातील एका खासगी रुग्णालयात नेऊन बाळावर उपचार केले. पोलिसांनी महिलेच्या भावाला चांबळी (पुरंदर) येथून बोलावून घेत बाळाला ताब्यात दिले.

तोपर्यंत नशा केलेल्या महिलेला शुद्ध आली होती. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे, नीलम पाचंगे, सारिका घोडके यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.