Pune: 23 जुलैनंतर लॉकडाऊन वाढवू नका, पुणे व्यापारी महासंघाची मागणी

Pune: Don't extend lockdown after July 23, demands Pune vyapari mahasangh तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर व्यवसायाला सुरुवात होऊन अर्थचक्राची गाडी रुळावर येत होती.

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील व्यापार प्रदीर्घ काळापासून बंद आहे. त्यामुळे येत्या २३ जुलैनंतर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात येऊ नये, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली आहे.

पुण्यातील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे दुकानांसाठी असलेली पी १, पी २ ही बंधनेदेखील काढण्यात यावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळिया उपस्थित होते. तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर व्यवसायाला सुरुवात होऊन अर्थचक्राची गाडी रुळावर येत होती. मात्र, पुन्हा लॉकडाऊन जाहीर केल्याने त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

व्यापाऱ्यांना एकीकडे बँकांचे व्याज, दुकानाचे भाडे, भरमसाठ लाइट बिल, कर्मचाऱ्यांचे पगार, घरखर्च असे अनेक खर्च आहेत. तर, दुसरीकडे व्यवसायच ठप्प असल्याने कोणतीही आवक नसून व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना संकटातून बाहेर काढणे ही सरकारचीही जबाबदारी आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. करामध्ये सुटही मिळत नाही. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मंगळवारपासून शनिवारपर्यंत 5 दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात आला आहे.

केवळ रविवारी दिवसभर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहणार आहेत. या कालावधीत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.