Pune: पैसे मिळवण्याच्या हेतूने सुरक्षारक्षकाचा खून करून मृतदेह नदीत फेकला, तिघांना अटक

Pune: Security guard killed, body dumped in river for money, three arrested मृत मिश्रा यांच्या बँक खात्यावर मोठ्याप्रमाणात पैसे असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती.

एमपीसी न्यूज- रांजणगाव एमआयडीसीतील एका गोडाऊनमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचे अपहरण करून त्याचा खून केल्यानंतर मृतदेह भीमा नदीत फेकणाऱ्या तिघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. लुटमार करण्याच्या हेतूने आरोपीने हा खून केल्याचे कबूल केले.

रामआसरे लालमन मिश्रा (वय 55) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी या खूनप्रकरणी कमलेश भीमराव पवार, विकास बाळासाहेब जगताप आणि लक्ष्मण शिंदे या तिघांना अटक केली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत मिश्रा हे शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले होते. त्यानंतर काही वेळातच आरोपी लक्ष्मण शिंदे आणि इतर दोघांनी एका गाडीतून मिश्रा यांचे अपहरण केले.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार प्राप्त होतात त्यांनी त्वरित अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास करत वेगवेगळ्या ठिकाणाहून आज (दि.19) पहाटेच्या सुमारास तिघांनाही ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे केलेला अधिक चौकशीत त्यांनी खून केल्याची कबुली दिली. पैशाच्या आमिषाने त्यांनी हा खून केल्याचे सांगितले.

मृत मिश्रा यांच्या बँक खात्यावर मोठ्याप्रमाणात पैसे असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यानंतर हे पैसे काढून घेण्याच्या या हेतूने त्यांनी मिश्रा यांचे अपहरण केले. त्यांना एका एटीएम जवळ नेऊन पैसे काढून देण्यासाठी धमकावले.

परंतु, मिश्रा यांनी विरोध केल्याने तिघांनी मिळून त्यांना बेदम मारहाण केली. गळ्यात दाबल्यामुळे त्यांचा गाडीतच मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येतात तिघांनीही पारगाव येथील पुलावरून त्यांचा मृतदेह भीमा नदीत फेकला आणि घरी जाऊन झोपले.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तिघांनाही आज पहाटेच्या सुमारास अटक केली. आज सकाळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीपात्रात शोध घेतला असता मिश्रा यांचा मृतदेह सापडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.