Pune : डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडून ससूनच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार काढला

एमपीसी न्यूज : राज्य शासनाने गुरुवारी डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार काढला. त्यांच्याजागी ससूनचे उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे अधिष्ठातापदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. दरम्यान, डॉ. चंदनवाले यांनी  वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सह संचालक पदाचा पदभार तात्काळ सांभाळावा, असा आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सह सचिव शिवाजी पाटणकर यांनी दिला आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर ससूनच्या नवीन इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. या इमारतीत रुग्णांवर उपचारही सुरु करण्यात आले आहेत. त्यापूर्वी जुन्या इमारतीतील २७ व २८ क्रमांकाच्या वॉर्ड मध्ये दि. ३१ मार्चपासून बाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, दोन दिवसापासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढले. त्यामुळे १६ दिवसातच हा आकडा ३८ वर पोहचला. शिवाय देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू दरात पुणे आघाडीवर आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यात अपयश आल्यानेच डॉ. चंदनवाले यांच्याकडील कार्यभार काढून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

राजकीय नेत्यांच्या तक्रारी भोवल्या

दरम्यान, डॉ. चंदनवाले यांच्याविरोधात राजकीय नेत्यांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू वाढत असल्याचा दावाही करण्यात आला होता. तसेच शासनाने मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्सचीही स्थापना केली आहे. या पार्श्वभूमीवरच डॉ. चंदनवाले यांच्याकडील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार काढण्यात आल्याची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.