Pune : देशातील प्रत्येक व्यक्ती सायबर सुशिक्षित असणे गरजेचे ;सायबर तज्ज्ञांचे मत

'सूर्यदत्त'च्या वतीने सायबर सुरक्षेवरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

एमपीसी न्यूज – “इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर सुरक्षा ही काळाची (Pune)गरज बनली आहे. आर्थिक व्यवहारापासून ते मनोरंजनापर्यंत माणूस आज पूर्णतः सायबर विश्वावर अवलंबून आहे.

पारंपारिक युद्धापेक्षा आज शत्रुराष्ट्र आणि गुन्हेगार सायबर हल्ल्याचा अधिक वापर करत आहेत. त्यामुळे देश खऱ्या अर्थाने सुरक्षित राहण्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्ती सायबर साक्षर व सुशिक्षित असणे गरजेचे आहे, असे मत सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीच्या वतीने सायबर सुरक्षेवरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या परिषदेवेळी ‘इंटरनेट विश्व, सायबर हल्ला आणि सायबर सुरक्षा’ यावर तज्ज्ञांनी विचारमंथन केले.
प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा सल्लागार ऍड. जयश्री नांगरे, चंदन चौरसिया, डॉ. नवीन चौधरी, सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे डॉ. हॅरोल्ड डिकॉस्टा, सायबर कायदा अभ्यासक ऍड. राजस पिंगळे, नाझमीन अन्सारी, आर. के. पिल्लई, पिंपरी-चिंचवड सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपायुक्त सागर पानमंद, ‘सकाळ’चे वरिष्ठ बातमीदार अनिल सावळे, ‘सूर्यदत्त’च्या अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, विभागप्रमुख प्रा. डॉ. मनीषा कुंभार आदी या परिषदेमध्ये सहभागी झाले होते.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “वेबसाईट हॅकिंग हा प्रकार आता जुना झाला आहे. आज कोणताही सोशल मीडिया पूर्णतः सुरक्षित नाही. त्यामुळे या विश्वामध्ये सुरक्षित राहण्यासाठी सर्वप्रथम काळजी घेणे आणि स्वतःवरच काही बंधने घालून घेणे गरजेचे आहे. या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. सायबर सुरक्षा सल्लागार म्हणून आज अनेक विद्यार्थी आपले करिअर घडवत आहेत. शिक्षण संस्थांनी ‘सूर्यदत्त’प्रमाणे सायबर सुरक्षेवरील अभ्यासक्रमांची निर्मिती केली पाहिजे.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सर्वांसाठी इंटरनेट सुविधा हे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. आज जेव्हा प्रत्येकजण इंटरनेट विश्वाशी जोडला गेलेला आहे, त्यावेळी देशातील प्रत्येक जण हा सायबर हल्ल्याला बळी पडू शकतो हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. याची जाणीव असल्यामुळे ‘सूर्यदत्त’ने देशात प्रथमच सायबर सुरक्षा आधारित अभ्यासक्रमांची आखणी केली आहे. बीएससी इन सायबर सिक्युरिटी या विषयावर पदवी देणारी ‘सूर्यदत्त’ देशातील पहिली संस्था आहे.”
ऍड. राजस पिंगळे म्हणाले, “आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे इंटरनेट वापर सहज झाला असला, तरी त्यामुळे धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सुशिक्षित नागरिकही सायबर हल्ल्याला बळी पडत आहेत त्यामुळे सायबर सुरक्षेच्या संदर्भात अधिक जनजागृती करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या ‘सायबर फॉर ऑल’ या उद्दिष्टामध्ये सहभागी होण्यासाठी ‘सूर्यदत्त’ने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.”
अक्षय मांडले म्हणाले, “आज सर्वसामान्यांना सायबर हल्ल्यामुळे निर्माण झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी केवळ माहिती आणि तंत्रज्ञान कायदा अस्तित्वात आहे. या कायद्याची माहितीही अनेकांना नाही. त्यामुळे एकदा ऑनलाइन फसवणूक झाली, तर काय करायचे याची देशातील बहुतांश लोकांना नाही. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत इतर कायदे बळकट करणे गरजेचे असून त्याचा लाभ सर्वसामान्यांना कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
आर. के. पिल्लई म्हणाले, “भविष्यात सायबर विश्वामध्ये कशाप्रकारे माणसावर हल्ला होऊ शकतो आणि त्यामुळे माणूस मुळापासून उध्वस्त होऊ शकतो याची पूर्णतः जाणीव असल्यामुळेच सूर्यदत्त इन्स्टिट्यूटने या अभ्यासक्रमाला महत्त्व दिले आहे. आज ज्या ठिकाणी संगणक आणि इंटरनेटचा वापर होतो, तेथे आपण सायबर हल्ल्याला बळी पडू शकतो. प्रत्येक व्यक्तीने सायबर सुरक्षेसंदर्भात जागरूक असावे.”
डॉ. नवीन चौधरी म्हणाले, “विद्यार्थ्यांना सायबर साक्षर व सुरक्षारक्षक बनविणे ही शिक्षण संस्थांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे पारंपारिक विषयांचे ज्ञान दिले जाते, त्याचप्रमाणे त्यांना सायबर विश्वामध्ये वावरताना आपण कशाप्रकारे सुरक्षित राहू शकतो आणि त्यासाठी कोणते शिक्षण घेतले पाहिजे याची माहिती देणे गरजेचे आहे.”
सागर पानमंद म्हणाले, “सोशल मीडियाच्या जगामध्ये लाईक्स आणि फॉलोवर्स मिळवण्याच्या हव्यासापोटी इतरांची बदनामी केली जाते. त्यामध्ये तरुणांचे प्रमाण मोठे आहे. अशाप्रकारे सोशल मीडियाचा गैरवापर केल्यामुळे अनेक सायबर झाले आहेत. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सोशल मीडियाचा योग्य व गरजेपुरता वापर केला पाहिजे.”
ऍड. जयश्री नांगरे म्हणाल्या, “आज मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण डिजिटल स्वरूपामध्ये वाढत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना डिजिटल गुन्हेगारी करण्यासाठी मोठ्या संधी मिळतात. आर्थिक देवाणघेवाणीमुळे प्रत्येकजण सायबर विश्वाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते, याची जाणीव सर्वसामान्यांना असणे गरजेचे आहे. ज्येष्ठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजगृती वाढवायला हवी.”
चंदन चौरसिया म्हणाले, “अनेकांच्या घर किंवा गृहनिर्माण संस्थांना सिक्युरिटी गार्डच्या स्वरूपात पारंपारिक सुरक्षा मिळालेली असते, परंतु असे असतानाही आपण प्रत्यक्ष खरेच सुरक्षित आहोत का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण जोपर्यंत सायबर सुरक्षेसंदर्भात जागरूक होत नाही, तोपर्यंत आपण आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या असुरक्षित  आहोत.”
अनिल सावळे म्हणाले, “सायबर हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. माध्यमे सातत्याने सायबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्याचे काम करतात. मात्र, वापरकर्त्यांनी सायबर सुरक्षेचे ज्ञान घ्यायला हवे. आर्थिक व्यवहार करताना किंवा सामाजिक माध्यमांवर व्यक्त होताना, आपली माहिती देताना आपण योग्य ती काळजी घेणे महत्वपूर्ण आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर साक्षरता हाच एकमेव उपाय आहे.”
डॉ. डीकोस्टा यांनी विद्यार्थ्यांना ‘सायबर सीक्यूरीटीतील विविध करिअरच्या संधीबाबत माहिती दिली. येणा-या काळात या क्षेत्रात मोठ्या मनुष्य बळाची गरज आसल्याचे त्यांनी नमूद केले. सायबर स्टॉकिंग, सायबर कॉन्ट्राबँड, सायबर ट्रेस पासिंग, सायबर लॉन्ड्रिंग, सायबर वाँडलीसम, सायबर डीफेमेशन, सायबर टेरररिसम, सायबर पोर्नोग्राफी आणि सायबर फ्रॉड अशा सायबर गुन्हेगारीच्या प्रकारांबद्दल त्यांनी माहिती दिली.
सायबर सुरक्षा क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. दीपक शिकारपूर, ऍड. राजस पिंगळे, डॉ. हॅरोल्ड डिकॉस्टा, चंदन चौरसिया, नवीनकुमार चौधरी, आर. के. पिल्लई, जयश्री नांगरे, नाझमीन अन्सारी, सागर पानमंद, अनिल सावळे यांना ‘सूर्यदत्त सायबर टेक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, डॉ. आरिफ शेख, प्रा. डॉ. मनीषा कुंभार यांनी परिषदेतील विविध परिसंवादांचे निवेदन केले. प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.