Pune : खासदार गिरीश बापट यांच्याकडून करोनाग्रस्तांसाठी आणखी 50 लाखांची मदत

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत आहे. पुण्यातही या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. ‘कोरोना’ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासणार आहे. सामाजिक जबाबदारी ओळखून खासदार गिरीश बापट यांनी प्रशासनाला आणखी 50 लाखाचा निधी खासदार निधीतून देऊ केला आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे याबाबतचे पत्र आज त्यांनी दिले. या पूर्वी त्यांनी 50 लाख रुपये देऊ केले आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत. डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, पोलीस तसेच प्रशासनातील अन्य अधिकारी, कर्मचारी या जीवघेण्या आजारावर मात करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांसाठी निधी कमी न पडू देणे ही लोकसेवक म्हणून आमची जबाबदारी आहे. याचसाठी मी माझ्या खासदार निधीतून पुन्हा 50 लाख रुपयांचा निधी देत आहे.

या पूर्वीही 50 लाख रुपयांचा निधी मी दिला आहे, असे गिरीश बापट यांनी सांगितले. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अवाहनानुसार माझे एक महिन्याचे मानधनही पक्षाकडे जमा केले आहे. या वैश्विक महामारीचा प्रसार फार झपाट्याने होतो. याचा प्रसार टाळण्यासाठी मोदीजींना 21 दिवसाचा लॉकडाऊन घोषित केला आहे.

या दरम्यान, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, बांधकाम मजूर यांच्यासारखे लोक अडकून बसले आहेत. त्यांना जेवण मिळत नाही. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी गरजूंपर्यंत धान्य, भाजीपाला तसेच जेवण पोहचवत आहेत. लॉकडाऊन घोषित झाल्यापासून कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत दररोज जवळपास दोनशे लोकांना एक वेळेचे जेवण पोहोच केले जात आहे.

पक्षाचे नगरसेवक त्यांच्या प्रभागातील गरजूंना धान्य तसेच इतर जीवनावश्यक गोष्टी पोहोच करत आहेत. बंदोबस्ता निमित्त रस्त्यावर असणाऱ्या पोलिसांना, सफाई कर्मचाऱ्यांना, डॉक्टर्स तसेच अन्य मेडिकल स्टाफ यांना मी माझ्याकडून चिवडा, लाडूची पाकिटे पोहोचवत आहे. समाजातील अन्य दानशूर व्यक्तींनी ही या संकटाच्या काळात पुढे येऊन आपापल्या परीने मदत करावी असे आवाहन ही खासदार बापट यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.