Pune : जखमी पक्ष्यांच्या बचावकार्यासाठी हेल्पलाईन सुरु; चीनी मांजाची छुपी विक्री थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत

एमपीसी न्यूज- मकरसंक्रातीच्या निमित्ताने ( Pune) पतंग आणि मांजा बाजारात दाखल झाला आहे. चीनी आणि नायलॉन मांजामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. मांजाने गळा कापल्याच्या घटना ताज्या आहेत. मांजामुळे पशु-पक्षांना मोठा धोका निर्माण होतो. या मांजाच्या वापरावर कायद्याने बंदी असूनही छुप्या पद्धतीने त्याची विक्री होत आहे. माणसांच्या जीवावर बेतणारा हा चीनी मांजा विकणार्‍यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि चिनी मांजाच्या विक्रीला आळा घालावा, अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली. या मांजामुळे जखमी होणार्‍या पक्ष्यांच्या बचावासाठी हेल्पलाईन सुरु केल्याची माहितीही त्यांनी दिली.

 


डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पतंगबाजी करणार्‍यांची लगबग सुरु होते. बाजारात विविध प्रकारचा मांजा येतो. बोहरी आळीसह शहर आणि उपनगरांतील छोट्या-मोठ्या दुकानांत हा मांजा विकला जातो. बहुतांश मांजा चीनी किंवा नायलॉनचा असतो. त्यामुळे अपघातांचे प्रकार वारंवार घडताना आपण पाहिले आहे. पुणे, नागपूर, नाशिकसह अन्य शहरात मांजाने गळा कापल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशा मांजाची निर्मिती, विक्री, साठवण, खरेदी व वापर यावर कायद्याने बंदी आहे.

चीनी मांजा सापडल्यास संबंधितांवर पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखाच्या आर्थिक दंडाची तरतूद आहे. मात्र, शासकीय यंत्रणेच्या ढिलेपणामुळे हा मांजा बाजारात विकला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या आधी घडलेल्या दुर्घटनांचे ( Pune) गांभीर्य लक्षात घेऊन चीनी मांजा विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. तसेच राष्ट्रीय हरित लवादाने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी आमची मागणी आहे.”

Chinchwad : हिंदू वीरशैव लिंगायत मंच, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने निषेध सभा संपन्न

या मांजाला माणसांसह अनेक पक्षीही बळी पडतात. त्यामध्ये कबुतरे, कावळे, घुबड, पोपट, घार आणि फुलपाखरे यांचा समावेश आहे. जखमी पक्ष्यांच्या बचावासाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठान गेल्या 20 वर्षांपासून काम करीत आहे. गेल्या आठ वर्षात जवळपास 2500 पक्ष्यांना वाचविण्यात यश आले आहे. यंदाही एक अ‍ॅम्ब्युलन्स, एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि चार-पाच कार्यकर्ते ही बचावकार्य मोहिम महिनाभर राबविणार आहेत. त्यासाठी हेल्पलाइन सुरु करण्यात आली असून, यामध्ये रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेस्क्यू वाइल्डलाइफ टीटीसी या संस्थांचे सहकार्य मिळाले आहे. जखमी पक्ष्यांबाबत डॉ. कल्याण गंगवाल (9823017343), सुनील परदेशी (9823209184), गौरव गाडे (7030285520) किंवा रेस्क्यू वाईल्ड लाईफ (9172511100) या क्रमांकावर माहिती देऊन अहिंसा प्रेमी नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. गंगवाल यांनी केले.

मांजा देणाऱ्यांना बक्षीस

संक्रांतीच्या निमित्ताने शहरातील वेताळ टेकडी, तळजाई टेकडी, हनुमान टेकडी यासह अन्य ठिकाणी पतंग उडवण्यास लोक जातात. इथे अनेकदा मांजा झाडावर अडकलेला दिसतो. हा मांजा जमा करून आणून देणाऱ्यांना संस्तेतर्फे 500 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, असेही डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.