Pune News : कोरोना काळातील योगदानाबद्दल महापालिका करणार गणेशोत्सव मंडळे आणि सेवाभावी संस्थांचा सन्मान : महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील सेवाभावी संस्था, गणेश मंडळे, विविध ट्रस्ट, एनजीओ, स्वयंसेवी संस्था यांनी कोरोना संकटाच्या दोन्ही लाटेच्या काळात मदतकार्यात मोठे योगदान दिले. महापालिका यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून विविध पातळ्यांवर मदतीचा हात पुढे करत पुणेकरांना आधार दिला. या सेवव्रतींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने कृतज्ञता सन्मान करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोरोना संकटकाळातील पुणेकर नागरिकांच्या सेवेसाठी झटलेल्या विविध संस्थांना मानपत्र देण्याच्या निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत महापौर मोहोळ यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ बोलत होते.

कृतज्ञता सन्मानविषयी माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘मागील दीड वर्षांपासून कोविड-१९ या महामारीमुळे पुणे शहरात मोठे संकट होते. लॉकडाऊनचे संकटामुळे सामन्यांना येणाऱ्या अडचणी आणि रूग्णसंख्येनेमुळे आरोग्य यंत्रणांवर ताण आला असता अशा परिस्थितीत देखील पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळे, ट्रस्ट, एनजीओ आणि सामाजिक संस्था यांनी आपल्या स्तरावर मोठे काम उभे केले. आपण आपल्या कुटूंबियांची काळजी घेतो, अगदी त्याचप्रमाणे समाजदेखील आपल्या कुटुंबाचा हिस्सा आहे. याप्रमाणे त्यांनी समाजाची काळजी घेतली. म्हणूनच या संस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आमचे कर्तव्य आहे.

‘शहरातील बहुतांश संस्थांनी समाजाप्रतीदेखील आपले सामाजिक कर्तव्य आहे, याची जाणीव ठेवून लोकांमध्ये कोविड-१९ विषयी जनजागृती केली, काहींनी रुग्णांना बेडस उपलब्ध करून दिले. तसेच कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी त्यांच्या स्तरावर मदत केली. पुरातन काळात एखाद्या प्रदेशाला जिंकण्यासाठी जसे प्रत्येक सैनिकाने आपली भूमिका योग्य रितीने पार पाडावी लागते, असे मोहोळ म्हणाले.

“या कोविड -१९ विरुद्धच्या लढ्यात पुणे महानगरपालिकेसोबत सैनिकांसारख्या या संस्था उभ्या राहिल्या. त्याचबरोबर त्यांनी त्यांची समाजाप्रती असलेली जबादारी योग्य रितीने पार पाडली. अश्या या मंडळांचे, ट्रस्ट, एनजीओ आणि सामाजिक संस्थाचे आपण फक्त शाब्दिक कौतुक न करता आपण त्यांच्या या समाज कार्याचा मानपत्र देऊन यथोचित सन्मान लवकरच करत आहोत’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.