Pune : मोदी यांनी पवार कुटुंबापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी – अजित पवार

एमपीसी न्यूज- पवार कुटुंबाचे मी आणि माझी बहीण बघून घेऊ. त्याची काळजी मोदींनी करू नये. काळजी करायची असेल तर मोदींनी शेतकऱ्यांची बेरोजगारांची करा. तुम्ही देशाच्या प्रश्नाकडे पहा आणि त्यावर अगोदर भूमिका मांडा, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज, बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमदेवार पार्थ पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार विश्वजीत कदम, काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे तसेच आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, युपीए सरकारच्या काळात मनमोहन सिंग हे कमी बोलतात अशी टीका सत्ताधारी करीत आहेत. मनमोहन सिंग हे कमी बोलत असतील पण ते मुद्द्याचे आणि कामाच बोलत असत. पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी, तरुणाचा रोजगार, भ्रष्टाचार या प्रश्नावर बोलले पाहिजे. मागील पाच वर्षात काय कामे केली हे जनतेसमोर आणा असे आव्हान त्यांनी दिले. पुणे शहरात पाणी प्रश्न गंभीर होऊन बसला असून त्यावर सत्ताधारी पक्षाकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. पण आम्ही सत्तेमध्ये असताना कधीही शहरी आणि ग्रामीण भागाला पाणी कमी पडू दिले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.