Pune: महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांसह, 3 सहाय्यक आरोग्य प्रमुख आजारी

Pune Municipal Health Heads, 3 Assistant Health Heads Sick महापालिका बेड्स उपलब्ध असल्याचा कितीही दावा करीत असली तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. या कालावधीत एका-एका बेडससाठी खासगी रुग्णालयांसमोर रांगा लागलेल्या आहेत. या कालावधीत आरोग्य विभागाची खरी गरज असताना महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह 3 सहायक आरोग्य प्रमुख आजारी पडले आहेत. त्यापैकी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.

महापालिका बेड्स उपलब्ध असल्याचा कितीही दावा करीत असली तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. बुधवारी सायंकाळी एका 33 वर्षांच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. मंगळवारी रात्री बेड मिळण्यासाठी या तरुणाला रुग्णालयाच्या दारोदारी फिरण्याची वेळ आली होती. त्यानंतर उशिरा बेड मिळाला.

तत्पूर्वी, व्हेंटिलेटर न मिळाल्याने निवृत्त शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला. पुणे शहरात सध्या कोरोनाचे 42 हजार 466 रुग्ण झाले आहेत. 25 हजार 129 नागरिकांनी वेळेतच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

1 हजार 68 नागरिकांनी या विषाणूमुळे आपला जीव गमावला आहे. या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. शहरात सध्या 16 हजार 269 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे पुणेकरांनी कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी आता खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुणे महापालिकेच्या 250 कर्मचारी, 7 ते 8 नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाली आहे. मधुमेह, लठ्ठपणा, किडनी, हृदयविकार आजार असणाऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.