Pune News : सुट्टीवर असलेल्या अग्निशमन जवानाने गाडीला लागलेली आग आणली आटोक्यात

एमपीसी न्यूज – ड्यूटी फर्स्ट म्हणत पुणे अग्निशमन दलातील (Pune News) सुट्टीवर असलेल्या जवानाने गाडीला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. हि घटना मंगळवारी (दि.11) रात्री साडे अकरा वाजता उंड्री पिसोळी, धर्मावत पेट्रोल पंपासमोर घडली.

 

रस्त्यावर बीएमडब्ल्यू गाडीला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून कोंढवा बुद्रुक अग्निशमन वाहन व वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते. परंतु, घटनास्थळी तेथील रहिवाशी असलेले व कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रात ड्युटी करणारे अग्निशमन दलातील देवदूतचे जवान हर्षद येवले हे आपल्या कुटुंबासमवेत सातारा रस्ता, केंजळ गाव येथे जत्रेकरिता चारचाकी वाहनातून जात असताना त्यांना एका वाहनाने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याचे दिसले.

त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का? याची प्रथम पाहणी करुन धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन  पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी तिथे अग्निशमन वाहन पोहोचताच जवानांनी पाण्याचा मारा करत आग पूर्ण विझवली. अग्निशमन दलाचे कार्य पार पडताच उपस्थित नागरिकांनी व कुटुंबियांनी जवान हर्षद येवले व इतर जवानांचेही कौतुक केले.

Pune : महाविकास आघाडीतील पक्षांनी एका विचाराने काम करावं – शरद पवार

या कामगिरीत देवदूत जवान हर्षद येवले तसेच कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथील (Pune News) वाहनचालक बाबुराव जाधव, अक्षय खरात व तांडेल सोपान कांबळे आणि जवान अभिजित थळकर, अर्जुन यादव, साहिल पडये, अनिल चव्हाण यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.