Pune News: पुण्यातील 12 ते 17 वयोगटातील तब्बल 7 लाख मुलांना लसीकरणाची प्रतीक्षा

एमपीसी न्यूज: राज्यातील बहुतांश भागातील शाळा सुरू झाल्या असून राहिलेल्या काही भागातील शाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. अशात शाळेत जाणाऱ्या विध्यार्थीचे लसीकरण करण्यात यावे अशी आग्रही मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे. पुणे शहरात 12 ते 17 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या तब्बल 7 लाख असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

मुलांना झायकोव्ह डी ही लस

केंद्र शासनाने पुणे जिल्ह्यातील 12 ते 17 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याबाबत सूतोवाच केले आहे. मात्र, पुणे शहराला लसीकरणाबाबत केंद्र तसेच राज्य सरकारकडून अद्यापही कोणताही आदेश आलेला नाही. मात्र मुलांना झायकोव्ह डी ही लस दिली जाईल, असे केंद्रीय आरोग्य सचिव डॉ. राजेश भूषण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामध्ये लसीकरण कमी झालेल्या जिल्ह्यांची यादी देखील केंद्राने जारी केली आहे. देशभरातून 28 हजारांहून अधिक जणांवर झायकोव्ह डीची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी 1 हजार जण 12 ते 17 वयोगटातील होते.

सीरम इंस्टिट्यूट कडून 7 ते 11 वयोगटातील मुलांवर लसीच्या ट्रायल

राज्यांमधील शाळा हळूहळू सुरु होऊ लागल्या आहेत. लहान मुलांना कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या लसीवर काम करत आहेत. सीरम इंस्टिट्यूट 7 ते 11 वयोगटातीलमुलांवर लसीच्या ट्रायलसाठी परवानगी दिली आहे.

शासनाकडून मुलांचे लसीकरणा बाबत निर्णय नाही

याबाबत महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, “केंद्र व राज्य शासनाकडून मुलांचे लसीकरण करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. परंतु, पुण्यात एकूण मुलांची संख्या 6 ते 7 लाखांच्या आसपास आहे. सूचना आल्यानंतर त्यांचे लसीकरण करण्याबाबत नियोजन केले जाणार आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.