Pune News: पुण्यातील मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजला पाचारण करा- आबा बागूल

मार्च महिन्यात कोरोना नवीन होता त्याच्या पायऱ्या आपल्याला माहीत नव्हत्या. परंतु, आता ती परिस्थिती राहिलेली नसून कोणत्या प्रकारचा कोरोना रुग्णाला झाला आहे. याचे निदान होऊन त्यावर उपचार करणे सोपे झाले आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे वाढत असलेले पुण्यातील मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजला (एएफएमसी) पाचारण करा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी गुरुवारी (दि.10) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असून दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वर्षे 55 पुढील डॉक्टरांना आपण निर्देश देऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर अशा अवघड परिस्थितीत हतबल होऊन घरीच बसले आहेत.

सद्यस्थितीत शहरामध्ये नवखे डॉक्टर असल्यामुळे त्यांना आयसीयू, सीसीयू मधील रुग्ण हाताळण्याचा अनुभव कमी असून ते घाबरत घाबरत रुग्णांवर उपचार करतात. कोरोनामुळे डॉक्टरांचा रुग्णांशी थेट संपर्क येत नाही. कोणतीही डॉक्टरांची टीम रुग्णांना हात लावून तपासत नाही. त्यामुळे पुणे शहरात मृत्यू दर वाढताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांत शहरात कोरोनाचा फैलाव झपाटयाने होताना दिसत असून देशाची तुलना केली तर पुणे हे कोरोनाचे नंबर एकचे हॉटस्पॉट झाले आहे.

वर्षे 55 पुढील अनुभवी डॉक्टर सध्या हतबल होऊन घरी असल्याने त्यांची मदत घेऊन व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे दररोज रुग्णांच्या परिस्थितीचा अहवाल घेऊन डॉक्टरांशी सल्लामसलत करून कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवतील. कोरोनाच्या संकट काळात रुग्णांचा मृत्यू होऊ नये यासाठी या अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला लाखमोलाचा ठरेल.

सद्यस्थितीत डॉक्टर दिवस-रात्र काम करत असून त्याला अनुभवी डॉक्टरांची जोड मिळाल्यास पुणे शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण नक्कीच कमी होईल याची खात्री वाटते. मार्च महिन्यात कोरोना नवीन होता त्याच्या पायऱ्या आपल्याला माहीत नव्हत्या. परंतु, आता ती परिस्थिती राहिलेली नसून कोणत्या प्रकारचा कोरोना रुग्णाला झाला आहे. याचे निदान होऊन त्यावर उपचार करणे सोपे झाले आहे.

कोरोनामुळे नागरिक जास्त दगावत नसून कोरोना झाला या भीतीने जास्त मृत्यू होताना दिसत आहे. या रुग्णांचे कौन्सिलिंग करण्यासाठी देखील या डॉक्टरांच्या अनुभवाचा खूप उपयोग होईल. यासाठी डॉक्टरांची कौन्सिलिंग टीम करणे देखील आता गरजेचे झाले आहे.

कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी एएफएमसीला शहरात त्वरित कार्यरत करावं, वर्षे 55 पुढील अनुभवी डॉक्टरांची हे संकट रोखण्यास मदत घ्यावी, अशी विनंतीही पत्रात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.