-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : भाडेतत्वावर देण्यात आलेल्या सदनिका संबधित भाडेकरु असलेल्या नागरिकांच्या नावावर करण्याचा निर्णय

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – महानगर पालिकेच्या मालकीच्या इमारतीमध्ये भाडेतत्वावर देण्यात आलेल्या सदनिका संबधित भाडेकरु असलेल्या नागरिकांच्या नावावर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

पालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात 1512 सदनिकांची विक्री करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून बारा ते पंधरा लाख रुपये या दरम्यान या सदनिका उपलब्ध होणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आनंद रिठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील विविध भागात रस्ता रुंदीकरण करताना अडथळा ठरणाऱ्या मिळकती ताब्यात घेत पालिकेने रस्ता रुंदीकरण केले आहे. या मिळकतीमध्ये राहत असलेल्या भाडेकरु यांचे पुनर्वसन पालिकेच्या वतीने पालिकेच्या मालकीच्या इमारतीमध्ये करण्यात आलेले आहे. प्रति महिना 450 रुपये या दराने पालिका या मिळकतीचे भाडे आकारते. या मिळकती संबधित भाडेकरु यांच्या नावावर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आला होता. त्यावर सोमवारी झालेल्या समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे रिठे यांनी सांगितले.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पालिकेच्या मुख्य खात्यासह औंध, कोथरूड, वारजे कर्वेनगर, ढोले पाटील रोड आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत या सदनिका भाडेतत्वावर देण्यात आलेल्या आहेत. यातील 1081 सदनिका मुख्य खाते तर 431 सदनिका क्षेत्रीय कार्यालयांच्या आहेत.

पालिकेने 1991-92 साला पासून अशा पद्धतीने भाडे तत्वावर सदनिका दिलेल्या आहेत. ज्या भागात या सदनिका आहेत, तेथील रेडिरेकनर चा दर लक्षात घेऊन याची विक्री केली जाणार आहे. सर्वसाधारण 12 ते 15 लाख या दरम्यान सदनिका उपलब्ध होणार आहेत. 270 चौरस फूट आकारातील या सदनिका आहेत. शहर सुधारणा समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे भाडेकरु आता मालक होणार असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे समितीचे अध्यक्ष रिठे यांनी सांगितले.

पालिकेने भाडे तत्वावर दिलेल्या सदनिकांची विक्री होणार असल्याने पालिकेला महसूल मिळणार आहे. या सदनिकांच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी होणारा पालिकेचा खर्च वाचणार आहे. तसेच या विकण्यात आलेल्या मिळकतीचा मिळकत कर जमा होणार असल्याने उत्पन्नाचा स्रोत वाढणार आहे.
– आनंद रिठे, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.