Pune News: दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन कसे करायचे,महापालिकेतर्फे काहीही नियोजन नाही 

फिरत्या हौदांचा मार्ग ठरवला, पण वेळापत्रक देण्यात आलेले नाही. पुणेकरांची गैरसोय होत असल्याचे दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज – आज (रविवारी) दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन कसे करायचे, असा सवाल पुणेकरांना पडला आहे. महापालिकेतर्फे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. फिरत्या हौदांची व्यवस्था महापालिका करणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते. मात्र, क्षेत्रीय कार्यलयांना अद्यापही काहीही सूचना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे काही गणेश भक्त विसर्जन करण्यासाठी नदीवर गेले आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी दिली. 

गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी आवश्यक अमोनिया कार्बोनेट पावडर वितरण करण्यात आले नाही. फिरत्या हौदांचा मार्ग ठरवला, पण वेळापत्रक देण्यात आलेले नाही. पुणे महापालिकेतर्फे घरीच विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक अमोनिया कार्बोनेट पावडर उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले होते.

आदल्या दिवशीच दीड दिवसाच्या गणपती विसर्जन करण्याचे नियोजन हवे होते. तशा सूचना क्षेत्रीय कार्यलयाला देणे गरजेच्या होत्या. मात्र, महापालिकेतर्फे काहीही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे पुणेकरांची गैरसोय होत असल्याचे दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

गणेश भक्तांचे वारंवार फोन येत आहेत. तर, सर्व 15 क्षेत्रिय कार्यालयनिहाय मुर्ती दान केंद्र, अमोनिया बायकाॅर्बोनेट पावडर वाटप केंद्र, फिरत्या गणेश विसर्जन हौदाचा मार्ग निश्चित केल्याचे कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.