Pune News: चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीकडून खून, गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा रचला बनाव

एमपीसी न्यूज – चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला झोपेत असतानाच गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव देखील रचण्यात आला. पुण्यातील उत्तमनगर परिसरात ही घटना घडली. परंतु पोलिसांच्या तपासात हा सर्व बनाव उघड पडला आणि त्यानंतर पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.

रमेश चंदु भिसे (वय 37) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी नंदिनी रमेश भिसे उर्फ नंदिनी राजू धस (वय 40) हिला अटक करण्यात आली आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रमेश आणि आरोपी नंदिनी हे दोघे पती-पत्नी आहे. पुण्याच्या उत्तमनगर परिसरात ते राहतात. मयत रमेश हा काहीही कामधंदा न करता दारू पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार पैशाची मागणी करत होता. नंदिनी हिच्या नातेवाईकां समोर तिला अपमानास्पद वागणूक देत होता.

याच कारणावरून 5 एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रमेश हा गाढ झोपेत असताना नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लटकावून आत्महत्या केल्याचा बनाव रचला. त्यानंतर पोलिसांना खोटी खबर दिली.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास केला असता नंदिनीच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. उत्तम नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.