Pune News: मनसे शहराध्यक्षपदावरुन वसंत मोरे यांना तडकाफडकी हटविले; साईनाथ बाबर यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – मशिदींवरील भोंग्यांसदर्भात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला  विरोध दर्शविणे मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना महागात पडले आहे. शहराध्यक्षपदावरुन मोरे यांना तडकाफडकी बाजूला सारत त्यांच्याजागी माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची  नियुक्ती केली आहे.

राज ठाकरे यांनी आज (गुरुवारी) पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला बाबू वागस्कर, अनिल शिदोरे, साईनाथ बाबर यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीत बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली.

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची दिली माहिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक श्री. साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी श्री. साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!

दरम्यान, या बदलावर वसंत मोरे यांनी  ट्विटरवर बाबर यांचा शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील आणि आपला मावळ्याच्या वेशभूषेतील फोटो ट्विट करत म्हणाले,   “अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई,

नेमके काय घडले होते?

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोग्यांना विरोध केला होता. मशिदीवरील हे भोंगे हटले नाहीत तर त्याच मशिदीसमोर लाऊडस्पीकर्स उभारून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा, असा आदेश ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला होता. दरम्यान, पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मी माझ्या प्रभागातील मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, अशी भूमिका घेतली होती.  त्यामुळे पुणे मनसेच्या गोटात वादळ निर्माण झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.