Pune News: मुख्य सभा टाळणारे स्थायी समितीची बैठक कशी घेतात ? विरोधी पक्षांचा संतप्त सवाल

वारंवार मागणी करूनही ऑनलाइन सभेत सहभागी होणाऱ्या इतर नगरसेवकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, सत्ताधारी मुख्य सभा टाळत आहेत. मग स्थायी समितीची बैठक कशी घेता? असा संतप्त सवाल विरोधी पक्षांनी बुधवारी ऑनलाइन सभेत विचारला.

राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या सर्व सभा व्हिडिओ कॉन्स्फरन्सिंगव्दारे घेण्याचे आदेश आहेत. तरीही पुणे महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभासदांच्या उपस्थितीत कशी घेतली जाते? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

वारंवार मागणी करूनही ऑनलाइन सभेत सहभागी होणाऱ्या इतर नगरसेवकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे, राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केला.

पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्याबाबत राज्य शासनाला विनंती केली आहे. पण, अद्यापही त्यासाठी परवानगी मिळाली नाही. त्यामुळे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी आयोजित केलेल्या आठही सर्वसाधारण सभा एकापाठोपाठ 22 सप्टेंबरपर्यंत तहकूब केल्या. यादरम्यान सभागृह नेते धीरज घाटे आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना एक कोटीचे विमा कवच कधी मिळणार, अशी विचारणा केली. त्यावर महापौर मोहोळ यांनी महापालिकेने कुठल्याही कंपनीकडून विमा काढलेला नाही. महापालिका थेट ५० लाखांची मदत देणार असल्याने विमा कंपनीने प्रस्ताव नाकारण्याचा प्रश्नच येत नसल्याचे उत्तर दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.