Pune News: डॉ .पुरू दधीच व डाॅ. विभा दधीच यांना विमल-भास्कर पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज –  नामवंत नृत्य संस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या वतीने रविवारी (दि. ५ ) जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे मध्य प्रदेश येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध कथक कलाकार महामहोपाध्याय डाॅ.पुरू दधीच (वय 81) यांना महाराष्ट्र प्रदेश पश्चिम विभागाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक सुरेश जाधव यांच्या हस्ते विमल-भास्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष पं. विकास कशाळकर यांच्या हस्ते डाॅ. विभा दधीच यांना विमल भास्कर हा  राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी रंगमंचावर प्रसिद्ध कथक नर्तक  डाॅ.पं.नंदकिशोर कपोते, सहाय्यक आयुक्त पिं.चिं.मनपा सुषमा शिंदे, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, नृत्य गुरू शमा भाटे, नृत्य गुरू मनीषा साठे, नृत्य गुरू रोशन दाते , माजी आमदार उल्हास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह, शेला, हार, बुके व रूपये पंचवीस हजार रोख असे  या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी सत्काराला उत्तर देताना डाॅ पुरू दधीच म्हणाले ” मला अनेक पुरस्कार मिळाले पण हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे. आपल्या जवळच्या
व्यक्तीकडून सन्मान मिळाला त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक आहे. नंदकिशोर कपोते यांना मी खूप खूप धन्यवाद देतो, व महाराष्ट्र सरकारने आता राष्ट्रीय पुरस्कार सुरू करावा ही इच्छा व्यक्त करतो”.

या वेळी प्रांत संघचालक सुरेश जाधव म्हणाले ” डॉ. पुरू दाधीच यांनी महाराट्र शासनाने राष्ट्रीय पुरस्कार सुरू करावा ही इच्छा व्यक्त केली, त्यांचे हे म्हणणे मी शासनाच्या योग्य व्यक्तीपर्यंत जरूर पोहचवेन.” पं. विकास कशाळकर म्हणाले,” डॉ. पुरू दधीच व डॉ. विभा दधीच यांची विमल-भास्कर पुरस्कारासाठी अतिशय योग्य निवड झालेली आहे, कारण त्यांचे कथक नृत्यातील योगदान मोलाचे आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी कथक नृत्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत व कथक नृत्याचे शास्त्रीय स्वरूप सिद्ध केलेले आहे.”
सर्व मान्यवरांचे डॉ. नंदकिशोर कपोते व राजेंद्र कपोते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

 

या पुरस्कार सोहळ्यानंतर पद्मश्री डॉ. दधीच यांनी मध्ययुगीन कथक नृत्य व कथक शास्त्र यावर व्याख्यान देऊन बहारदार नृत्यप्रदर्शन केले.  प्रारंभी स्वतः  डॉ.पुरू दधीच यांनी 81 व्या वर्षी शिव-पार्वती वंदना सादर करून रसिकांना आश्चर्यचकित केले.

यानंतर त्यांचे शिष्य पियूष राज यांनी गणेश वंदना, सुनील सुंकरा यांनी पुष्पांजली व भूमिपूजन सादर केले. तसेच हर्षिता दाधीच यांनी रंगदेवतांची पूजा, ‘ कस्तुरी तीलकम् ‘ प्रस्तुत केले.  कार्यक्रमाचे निवेदन कीर्ती रामदासी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.