Pune News : पूनावाला यांची जादा डोस देण्याची अजूनही तयारी, पण…

एमपीसी न्यूज – कोविशिल्ड लसीचे जादा डोस पुण्याला देण्याची सिरम इन्स्टीट्यूटची अजूनही तयारी आहे. पण भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या करंटेपणामुळे जादा डोसला मुकावे लागत आहे, असा आरोप माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे.

पुण्यातील साथीचा जोर पाहता कोविशिल्डचे जादा डोस देण्याची तयारी आहे, असे सिरमचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारताना सांगितले. फक्त याकरिता केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. पूनावाला यांचे तरी ऐकून भाजपचे स्थानिक नेते हलतील का? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे.

साथीच्या दुसऱ्या लाटेत पुण्याला जबर तडाखा बसत होता. त्या सुमारास सिरम इन्स्टीट्यूटचे आदर पूनावाला यांनी मे महिन्याच्या १४ तारखेला महापौरांना पत्र पाठविले आणि केंद्र सरकारची परवानगी घ्यावी असे सुचविले. याला प्रतिसाद न देता महापौरांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना भेटू अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. लसीकरणाचे महत्त्व ओळखा आणि सिरमचे जादा डोस मिळवा. पुणेकरांच्या जिवाशी खेळू नका, असे आवाहन मी त्याच वेळी भाजपचे खासदार, आमदार आणि महापौरांना केले होते.

तीन महिने उलटले तरी भाजप नेते याबाबत गंभीर दिसत नाहीत. लसीकरणाचे राजकारण आम्हाला करायचे नाही. पण पूनावाला स्वतः जादा डोस देण्यास उत्सुक असताना सत्ताधारी भाजपचे खासदार, महापौर केंद्राकडून मंजुरी आणू शकत नसतील तर तो त्यांचा करंटेपणा म्हणावा लागेल, अशी खंत मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.