Pune News: तर पार्थच्या प्रचारासाठी सर्वात प्रथम मी मावळात जाईन – रोहित पवार

एमपीसी न्यूज – पार्थ पवार जर मावळातून निवडणुकीला उभा राहिला तर सर्वात प्रथम त्याच्या प्रचारासाठी मी जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मावळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस साठी सोडावा असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा मावळ मतदार संघ विषयी चर्चा सुरू झाल्या होत्या. राजकीय वर्तुळातून ही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार म्हणाले, पार्थला उमेदवारी मिळाली तर मावळमध्ये जाऊन  प्रचार करणारा राष्ट्रवादीचा पहिला कार्यकर्ता मी असेन. पार्थ पवार यांच्या उमेदवारीला रोहित पवार यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

 

पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदार संघ महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात लढत झाली होती. यावेळी पार्थ पवार यांचा पराभव झाला असला तरी अधून मधून त्याचं नाव या मतदारसंघासाठी चर्चेत येत असतं.

महाविकास आघाडीत सारं काही आलबेल!

त्याच बरोबर सतत बोलले जात आहे की आमच्या तिन्ही पक्षात कुठेतरी अलबेल नाही. मात्र हा एक भाजपचा डाव आहे.  आमच्या तिन्ही पक्षांमध्ये एक मताने आम्ही काम करत असल्याचे सूतोवाच देखील आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. शरद पवार यांनी राज्यभर फक्त आग लावण्याचे काम केले आहे त्यामुळे त्यांनी त्यांचे आडनाव  बदलून आगलावे ठेवावं अशी टीका खोत यांनी शरद पवार यांच्यावर ती केली होती. त्यांच्या याच टीकेला  आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

सदाभाऊ असं बोलत आहेत म्हणजे त्यांची आमदारकी संपत आली का हे आधी आपल्याला पाहावं लागेल. त्यांनी अगोदर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, शेतकऱ्यांच्या नावावर ते मोठे झाले आणि पद मिळालं की ते शेतकऱ्यांनाच विसरले. अशी टीका रोहित पवार यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.