Pune News: पीएमपीएमएलचा 18 एप्रिलला बस डे! पुणेकरांसाठी राबवणार विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – जास्तीत जास्त पुणेकरांना ‘पीएमपीएल बस’कडे आकर्षित करण्यासाठी प्रशासनाकडून 18 एप्रिल रोजी ‘बस-डे’ दिवस साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त प्रवाशांसाठी विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली

पुणेकरांच्या लाडक्या पीएमपीएमएलचा 19 एप्रिल रोजी वर्धापन दिवस आहे. या वर्धापन दिवसानिमित्त पीएमपीएमएल प्रशासनाने या वर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त पुणेकरांना ‘पीएमपीएल बस’कडे आकर्षित करण्यासाठी प्रशासनाकडून 18 एप्रिल रोजी ‘बस-डे’ दिवस साजरा केला जाणार आहे.

या दिवशी प्रवाशांना तिकीटदरात अंशतः सवलतही दिली जाणार आहे. तशी चाचपणी केली जात आहे. पीएमपीएलच्या विविध योजना आणि मार्ग याबाबत प्रवाशांना माहिती व्हावी, असाही या उपक्रमांचा उद्देश असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

पीएमपीएल प्रशासनाने यासंदंर्भात नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली. यावेळी सहव्यस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरूरे व इतर अधिकारी उपस्थित होते.

बसडेनिमित्त नागरिकांमध्ये वाहतूक जनजागृती केली जाणार आहे. 14 ते 23 या कालावधीत वेबिनार, चर्चासत्रच्या माध्यमातून माहितीची देवाण-घेवाण करणे, महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. पुणेकरांनी प्रवासासाठी जास्तीत जास्त पीएमपीएलचा वापर करावा, असा उद्देश आहे.

‘बस-डे’ दिवशी तिकीटदरात अंशतः सवलत देण्याबाबत प्रशासनाकडून विचार सुरू आहे. त्यानुसार प्रवाशांची अंदाजे संख्या व यामुळे प्रशासनावर पडणारा अतिरीक्त अर्थिक भार याचा अभ्यास करून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

शहरातील पर्यावरण राखण्यासाठी प्रशासनाकडून जुन्या डिझेल बसेस बाद करण्यावर भर दिला जात आहे. तर, पर्यावरणपुरक वाहतुकीसाठी ताफ्यात सीएनजी व इलेक्ट्रीक बसेस वाढविण्यासाठी भर देण्यात येत आहेत. सध्या ताफ्यात 40 डिझेल बसेस आहेत. या बसेसदेखील लवकर बाद करण्यात येतील. यानंतर पुण्यात डिझेल बस धावणे बंद होईल, असे मिश्रा यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.