Pune News : स्पर्धात्मक सरावासाठी पुण्यातले जलतरण तलाव खुले

एमपीसी न्यूज : मिशन बिगिन अगेन अंतर्गत पुण्यातील जलतरण तलाव स्पर्धात्मक जलतरणपटूंच्या सरावासाठी सुरु करण्यास पुणे महापालिकेने परवानगी दिली आहे. आजपासून (शुक्रवार) हे तलाव स्पर्धांच्या सरावासाठी सुरु होऊ शकतील. मात्र, हे तलाव सुरु करण्यासाठी क्रीडा विभागाने तयार केलेल्या कडक नियमावलीचे पालन खेळाडू, पालक व जलतरण तलाव चालकांना करावे लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 मार्चला जलतरण तलाव बंद झाले. त्यानंतर 5 नोव्हेंबरपासून राज्य शासनाने स्पर्धात्मक सरावासाठी जलतरण तलाव सुरु करण्याची परवानगी दिली होती. मात्र, पुण्यात ही परवानगी नव्हती. आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेश काढून तलाव सुरु करण्यास परवानगी दिली.

या आदेशानुसार केवळ राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या जलतरणपटूंनाच तलाव वापरता येणार आहे. सर्वसाधारण व्यायामासाठी जलतरण तलावांचा वापर करण्यास अद्यापही मनाई आहे.

केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाने जलतरण तलाव सुरु करण्यासाठी नियमावली तयार केली होती. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने कडक नियमावली तयार केली आहे. जलतरणपटूंना सरावासाठी येताना व घरी जाताना फेसमास्क लावणे सक्तीचे आहे.

तलाव चालकांनी तलावावर येणाऱ्या जलतरणपटूंची रोज तापमान व ऑक्सीजन पातळी तपासणे आवश्यक राहणार आहे. तसेच प्रवेश करण्याच्या दरवाजावर सॅनिटाझरने हात स्वच्छ करावे लागणार आहेत. तसेच सरावासाठी येणाऱ्या जलतरणपटूंना मान्यतेचा फाॅर्म भरुन द्यावा लागणार आहे. त्यावर प्रशिक्षकाचीही स्वाक्षरी राहिल.

जलतरणपटूंना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास त्यांनी आपल्या प्रशिक्षकाला व तलाव चालकांना याची कल्पना द्यावी लागेल. अशा खेळाडूंना सरावासाठी येता येणार नाही. तसेच सरावासाठी लागणारी उपकरणे प्रत्येक खेळाडूला स्वतः आणावी लागतील.

त्याची देवाणघेवाण करता येणार नाही. ज्या जागांना उदा. तलावाची हँडल, शिड्या खेळाडूंचा स्पर्श होईल, अशा जागा वारंवार सॅनिटाईज करण्याची जबाबदारी जलतरणतलाव चालकांची असेल. कपडे बदलण्याच्या खोल्या, टाॅयलेट्स आदींचेही वारंवार सॅनिटायझेशन करावे लागणार आहे.

डेक्कन जिमखानाचे टिळक तलावाचे सचिव अमित गोळवलकर म्हणाले, पुणे महापालिकेने स्पर्धात्मक सरावासाठी जलतरण तलाव सुरु करण्यास परवानगी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. कोरोनाच्या काळात अधिक काळजी घेऊन जलतरण तलाव चालू ठेवावे लागतील. यासाठी आवश्यक ती तयारी सुरु केली आहे.

खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, खेळाडूंना घेऊन येणारे पालक आणि स्टाफ यांच्या आरोग्याची सर्व ती काळजी नियमांनुसार घेतली जाईल. 14 मार्चपासून जलतरण तलाव बंद आहे. आमचे खेळाडू त्यांच्या प्रशिक्षकांच्या सहाय्याने झूम सारखी साधने वापरुन स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र, आता त्यांना प्रत्यक्ष पाण्यात सरावाची संधी मिळेल. यंदा कुठल्याही स्पर्धा होणार नसल्या तरी पुढील स्पर्धांसाठी प्रत्येकाला तयारी करता येईल. मात्र, सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊनच सराव करावा, असे सर्व खेळाडू व पालकांना आवाहन आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.