Pune News: प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यश मिळविण्यातच खरी कसोटी- अंकुश नाळे 

एमपीसी न्यूज – महावितरणने अनेक संकटांना यशस्वी तोंड देत आजवर प्रगतीच केली आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे आर्थिक संकटासह इतर विविध आव्हाने समोर असले तरी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यश मिळविण्यातच खरी कसोटी असते. वीजग्राहकांच्या सहकार्याने या आव्हानांवर लोकाभिमुख व सार्वजनिक कंपनी म्हणून आपण निश्चितच मात करू, असा विश्वास पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी व्यक्त केला.

गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’मध्ये शुक्रवारी (दि. 2) राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती तसेच पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नाळे बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांची उपस्थिती होती. कोविड-19 चे काटेकोरपणे नियम पाळून अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम झाला.

_MPC_DIR_MPU_II

महात्मा गांधी यांनी ग्राहकसेवेबाबत दिलेल्या मोलाच्या संदेशानुसार ग्राहकसेवा देण्याचे तसेच प्रादेशिक विभागात सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) नाळे यांनी यावेळी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. ते म्हणाले की, वीजग्राहक हे महावितरणचे खरे आधारस्तंभ आहेत. कोरोना विषाणूने सध्या जगाला ग्रासले असले तरी हळूहळू अनलॉकमुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. महावितरणसाठी हा काळ अत्यंत खडतर आहे. मात्र सर्वांची कर्तव्यनिष्ठा, अथक परीश्रम, उत्कृष्ट ग्राहकसेवा आणि वीजग्राहकांचे सहकार्य यामुळे सर्व संकटांवर निश्चितपणे मात करता येईल. कोरोनाच्या संकटकाळात महावितरणचे वीजयोद्धे देत असलेली ग्राहकसेवा ही अभिमानास्पद आहे. मात्र सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड-19 चे नियम पाळून आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

कार्यक्रमात अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार, उपमहाव्यवस्थापक अभय चौधरी, जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता संतोष पटनी यांनी केले. यावेळी सहायक महाव्यवस्थापक  दिप्ती आंबेकर-माळवदे, कार्यकारी अभियंता श्रीगडीवार आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.