Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांना अभिवादन देण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे आयोजन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने (Pune) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’मध्ये अधिकाधिक लोकसहभाग वाढावा या उद्देशाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांना अभिवादन, ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’, ‘ज्ञान सरिता ग्रंथदिंडी’,आणि ‘टॅलेंट हंट’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्यालय या महोत्सवाचे सह-आयोजक आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघ, भारतीय विचार साधना, इस्कॉन हे सह – प्रायोजक आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील ‘इंटरनॅशनल बुक सर्व्हिस’ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तक खरेदीसाठी येत असत. पुण्यात आले की बाबासाहेब हमखास या दुकानाला भेट देत. ‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी साहित्यिक गप्पांचे आयोजन करण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, साहित्यिका श्यामाताई घोणसे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आणि काही ज्येष्ठ साहित्यिक सहभागी होणार आहेत. बुधवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता 7’इंटरनॅशनल बुक सर्व्हिस’ येथे हा कार्यक्रम होणार आहे.

BJP Pune : पुणे लोकसभा भाजप उमेदवाराबाबत उत्सुकता

‘शांतता पुणेकर वाचत आहेत –

गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत जो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पुस्तक वाचनाचे आवाहन करण्यात (Pune) आले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व महाविद्यालये, शाळा, ग्रंथालये, प्रकाशन संस्था, साहित्यिक, लेखक, सामाजिक संस्था, गणेश मंडळे, व्यापारी संस्था, राजकीय पक्ष यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे. शहरातील पाच हजार संस्था या उपक्रमात सहभागी होतील असे अपेक्षित आहे.

या उपक्रमाअंतर्गत त्याच दिवशी सकाळी 8 वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पाच हजार पालक आपल्या पाल्यांना गोष्टी सांगणार आहेत. पुणे महापालिकेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आई जिजाऊंनी बाल शिवबावर गोष्टींतून संस्कार केले. या संस्कारातून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज घडले.

गोष्टी सांगणे भारतीय ज्ञान परंपरेतील एक महत्त्वाचा घटक आहे. गोष्टींतून अनेक पिढ्या संस्कारक्षम झाल्या. गोष्ट ही प्रवाही साहित्य असल्याने पुढच्या पिढीपर्यंत ती पाहोचते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात याचा वारंवार उल्लेख केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आनंददायी शिक्षण देण्यासाठी गोष्ट सांगणे ही बाब अधोरेखित केली आहे. यांचा विचार करून पुणे महापालिकेने हा उपक्रम आयोजित केला आहे.

‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’

शुक्रवार, दिनांक 15 डिसेंबर रोजी तीस ठिकांणांहून ज्ञान सरिता ग्रंथ दिंड्यांचे प्रस्थान होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत तीस महापुरुष, साहित्यिक यांच्या ग्रंथ दिंड्या त्यांच्या स्थानावरून येणार आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज,राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक आदींच्या ग्रंथ दिंड्यांचा समावेश असणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत तीस महाविद्यालयांवर दिंड्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सर्व दिंड्या त्यांच्या ठिकाणापासून डेक्कन परिसरातील नदीपात्रात एकत्र येतील. तेथून एकत्रितपणे त्या फर्ग्युसन महाविद्यालयात पोहोचतील. या ठिकाणी ‘भारत’ हा शब्द मोठ्या अक्षरात लिहिलेला असेल. सर्व ग्रंथ ग्रंथयज्ञाच्या स्वरूपात ‘भारत’ या अक्षरामध्ये ठेवले जातील.

टॅलेंट हंट –

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘टॅलेंट हंट’चे आयोजन करण्यात आले आहे. कविता, भाषण, गायन, कथा-कथन, सुलेखन, चित्रकला अशा विविध स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य कार्यक्रमात व्यासपीठावर आपल्या कलांचे सादरीकरण करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.