Pune News : पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत जुगार अड्ड्यावर छापा, 58 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – कोंढव्यात उच्चभ्रु सोसायटीत पोकर जुगार चालविणाऱ्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा कारवाई केली आहे. येथून तब्बल ५८ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यात विदेशी मद्यासह, ऑस्ट्रेलियन डॉलर, युएस डॉलर तसेच पोकरची दहा टेबर असा समावेश आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. जितेन जगदिप सिंग (वय ४२) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली असून, याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अवैध प्रकार बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. तर, स्वत: गुप्त माहिती काढून देखील ते स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेला सूचना देऊन कारवाई करण्याच्या आदेश देत आहेत. यादरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांना एनआयबीएम रस्त्यावरील सैनिकनगर क्लाऊड नाईन सोसायटीच्या बंगला क्रमांक १६ येथे सिंग हा पोकर जुगार खेळवत असल्याचे तसेच येणाऱ्या नागरिकांना विदेशी दारू देखील पुरवत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार, ही माहिती वरिष्ठ निरीक्षक शिल्पा चव्हाण यांना देण्यात आली. माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान सिंग याच्या घरातून पोकरचे दहा टेबल, विदेशी दारू, परदेशी चलन असा एकूण ५८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, त्याच्याकडे परदेशी चलन कसे आले तसेच याठिकाणी खेळण्यास कोण-कोण येत होते, याबाबत माहिती घेतली जात आहे. यात मोठ्या हस्तींचा समावेश असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे. त्यामुळे अनेकांचे धांबे दणाणले आहेत. कोंढव्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.