Pune : पुणे-बंगलोर महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने महामार्गावरील वाहतुकीत बदल

महामार्गावरील वाहतूक पुणे-सोलापूर महामार्गावर वळवली

एमपीसी न्यूज – सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-बंगलोर महामार्गावरील पूल पाण्याखाली गेला. यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे-बंगलोर महामार्गावरील वाहतूक पुणे-सोलापूर महामार्गावरून वळवण्यात आली आहे.

मागील आठ ते दहा दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाऊस  पडत  आहे. झालेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. तर काही शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर असलेल्या पुलांवर पाणी आले. पुलांवर पाणी आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

अचानक वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या. बिघडलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुणे-बंगलोर महामार्गावरील वाहतूक पुणे सोलापूर महामार्गावरून वळविण्यात आली आहे. पुणे बेंगलोर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पुणे सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरून जाण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.