Pune : पुणे गारठले ! पारा 5.1  अंशावर 

नारायणगाव, ओतूर जुन्नर परिसरात दवबिंदू गोठले

एमपीसी न्यूज-आठवड्यापूर्वी पुण्याच्या तापमानात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे पुण्यातून थंडीने काढता पाय घेतला असे वाटत असतानाच आज पुण्यातील किमान तापमानाने नीचांक गाठला आहे. आज पुण्याचे किमान तापमान 5.1 अंश सेल्सियस इतके नोंदले गेले आहे. गेल्या दहा वर्षातील पुण्यातील हे सर्वात नीचांकी तापमान आहे. 

पुणे शहरासह राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली असून हा जोर आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी पुणे शहरात 17 जानेवारी 1935 रोजी किमान तापमान 1.7 अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले होते. त्याचप्रमाणे मागील काही वर्षापूर्वी पुणे शहरातील फेब्रुवारी महिन्यातील नीचांकी तापमान 3.9 इतके नोंदवण्यात आले होते.

आठवड्यापूर्वी ढगाळ हवामानामुळे तसेच बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुण्यातील थंडी गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र अचानक राज्याच्या काही भागात सरासरीच्या तापमानात घट होऊन पुन्हा थंडीने डोके वर काढले आहे. त्यामुळे पुणेकर गारठून गेले असून सध्या शहरात दिवसभर गारठा जाणवत आहे. दिवस देखील थंड वाऱ्याचे झोत जाणवत असल्यामुळे स्वेटर घालून फिरण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या तापमानात तर मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

महाबळेश्वर येथे शुक्रवारी राज्यातील नीचांकी 9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्याचप्रमाणे येत्या तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुन्हा तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, कोकण आणि विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

नारायणगाव, ओतूर जुन्नर परिसरात दवबिंदू गोठले

सर्वसाधारणपणे महाबळेश्वर येथे थंडीमुळे हिमकण साठल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत. यंदा थंडीने उच्चांक गाठल्याचे दिसून येत असून नारायणगाव, ओतूर जुन्नर परिसरात दवबिंदू गोठल्याचे चित्र दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.