Pune : पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी-रामदास आठवले

आपद्ग्रस्त भागाची पाहणी व नागरिकांचे सांत्वन

एमपीसी न्यूज- पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात ओढवलेली पूर परिस्थिती गंभीर आहे. अनेकांचे जीव गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना अधिकाधिक मदत मिळायला हवी. आचारसंहिता लागू असली, तरी प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच या भागातील लोकांना पक्की घरे देऊन त्यांचे कायमस्वरूपी पुनवर्सन करण्याबाबत प्रयत्न करणार आहे,” असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी दिले.

यावेळी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, महिला आघाडीच्या संगीता आठवले, ऍड. अयुब शेख, ऍड. मंदार जोशी, शहर संपर्कप्रमुख अशोक कांबळे, निलेश आल्हाट, नगरसेविका हिमाली कांबळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, सचिव बाबुराव घाडगे, शाम सदाफुले, वसीम शेख, वसंत बनसोडे, मोहन जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

रामदास आठवले यांनी अरण्येश्वर, टांगेवाला कॉलनी, आंबेडकर वसाहत, आंबीलओढा, राजेंद्रनगर येथील पूरग्रस्त भागांना भेटी देऊन नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. आचारसंहिता असली, तरी प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून अधिकाधिक मदत देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी पूरग्रस्तांना दिले. त्यांनतर पत्रकारभवन येथे रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रामदास आठवले म्हणाले, “टांगेवाले कॉलनी येथील बांधकाम व्यावसायिकाने येथील नागरिकांना पुनवर्सन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळलेले नाही. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत. अनेक सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांना जेवण, निवास व इतर वस्तुरूप मदत केली आहे. मात्र, अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जनावरे दगावली आहेत. अशा सगळ्या लोकांना मदत देण्यासाठी सरकार व प्रशासन प्रयत्न करील, यावर माझे लक्ष आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.