Pune News : व्हेंचर कॅपिटलसाठी सर्वोतोपरी मदत करणार – रामदास आठवले

  मागासवर्गीय उद्योजकांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परिषद

एमपीसी न्यूज :  आता मागणारे हात न होता देणारे हात व्हा, असा सल्ला देत  मागासवर्गीय उद्योजकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘व्हेंचर कॅपिटल फंड’ योजनेसाठी सर्वोतोपरी मदत मी करीन असे आश्वासन सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी दिले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग, 20 मार्च फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्थिक समतेचे उद्धिष्ट आणि व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्युल कास्ट’ ही मागासवर्गातील  पहिल्या पिढीच्या उद्योगांची परिषद भरविण्यात आली होती.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सुखदेव थोरात (ऑनलाइन पध्दतीने), व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  स्टडीज विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, आयआरएस अजय ढोके, 20 मार्च फाऊंडेशनचे संस्थापक संचालक अविचल धिवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनिल धिवार, संतोष मदने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अविचल धिवार यांनी प्रास्ताविकपर भाषणात ‘व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्युल कास्ट’ या योजनेतील त्रुटी दाखवत ही योजना अधिक चांगल्या प्रकारे राबविता येईल हे पुरावे देत सादरीकरण केले. तर अजय ढोके यांनी शासकीय योजनांमध्ये धोरण, त्याची अंमलबजावणी आणि त्यातील आवश्यक बदल याविषयी सविस्तर भाष्य केले.

मिलिंद कांबळे यांनी ज्याप्रमाणे व्हेंचर कॅपिटल फंड आहे त्याप्रमाणे मागासवर्गीय नउद्योजकांसाठी स्टार्टअप फंड द्यावा अशी मागणी केली.

यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनीही चांगल्या संकल्पना घेऊन या त्याची सुरुवात नक्की केली जाईल असे आश्वासन दिले. तर राजेश पांडे यांनीही  परिषदेच्या कामाचे कौतुक केले.

मागासवर्गीय उद्योजकांची संख्या ही त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यातही घरगुती व लहान स्वरूपातील व्यवसाय अधिक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या उद्योगात मागासवर्गीयांची संख्या वाढवायची असेल तर त्यांच्या मूळ प्रश्नांवर काम करायची गरज आहे. आजही जातीयवाद हा एक प्रमुख प्रश्न यांच्यासमोर आहे. सरकारने आर्थिक मदत वाढवून या मूळ प्रश्नावर काम करणे गरजेचे आहे.

– सुखदेव थोरात, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.