Akurdi News : महापालिका निवडणुकीत भाजपने 139 पैकी ‘रिपाइं’ला 39 जागा द्याव्यात – रामदास आठवले

एमपीसी न्यूज – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भाजपची युती आहे. महापालिका निवडणूक भाजपसोबत लढविणार आहोत. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निवडणुकीची शक्यता आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपने 139 पैकी रिपाइं’ला 39 जागा द्याव्यात, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्याचा भाजपने विचार करून आम्हाला जागा सोडाव्यात अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. भाजपचा महापौर झाला तर ‘रिपाइं’ला उपमहापौरपद द्यावे असेही ते म्हणाले.

रिपाइंचा संकल्प मेळावा पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज पार पडला. त्यापूर्वी आठवले यांनी आकुर्डीत पत्रकारांशी संवाद साधला. रिपाइंच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे, बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिका देशातील श्रीमंत महापालिका आहे. महापालिकेने झोपडपट्टी पुनर्वसन व्यवस्थित केले पाहिजे. झोपडपट्टीतील नागरिकांना पक्की घरे द्यावीत. रेल्वे पटरी लगतच्या नागरिकांच्या घराबाबत रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. नागरिकांच्या पुनर्वसनासाठी रेल्वेने जागा द्यावी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब जातीपातीचे राजकारण करतात कि नाही तो वेगळा विषय आहे.

पण, त्यांचे खालचे कार्यकर्ते जातीपातीचे राजकारण करत आहेत. 2018 मध्ये भीमा कोरेगावमध्ये दंगल झाली. त्या भागातील आणि सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही पण पक्षामध्ये काम करणाऱ्या अनेकांचा त्यात सहभाग होता अशी आमची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, पवार साहेबांनी आदेश दिला म्हणून असे केले आमचे म्हहणे नाही. पण, खालच्या पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस जातीपातीचे राजकारण करते हे खरे आहे. हिंदुचे भोंगे मस्जिदसमोर लावू नयेत. समोरा-समोरा भोंगे लावून वाद निर्माण करू नका, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.