Pune : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर चर्चमधील धार्मिक कार्यक्रम रद्द

एमपीसी न्यूज – करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील चर्चचे सर्व धार्मिक कार्यक्रम 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. गुड फ्रायडेपर्यंत सकाळी व सायंकाळी प्रार्थना सभांचे आयोजन केले जाते. त्यामुळे अनेक भाविक उपस्थित राहत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. पुणे धर्मप्रांताचे बिशप पॉल दुपारे यांनी शासनाचा पुढील निर्णय येईपर्यंत चर्च चे सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले आहे.

रास्ता पेठ येथील ख्राईस्ट चर्चने 31 मार्चपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याचे सचिव सतीश चांदेकर यांनी सांगितले आहे. कसबा पेठ येथील ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चर्चचे सचिव नोवेल देठे यांनी सांगितले .

खडकी येथील सेंट अँड्रयूज चर्चने देखील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द केले असून रविवारी सामुदायिक भक्ती घेतली जाणार नसून फक्त व्यक्तिगत प्रार्थनेसाठी चर्च खुले ठेवण्यात येणार असल्याचे अध्यक्ष बन्यामीन गायकवाड यांनी सांगितले.

ख्रिस्ती युवक प्रार्थना मंडल तर्फे गुड फ्रायडे पर्यंत 40 दिवसात ख्रिस्ती सभासदांच्या घरी जाऊन प्रार्थना सभा घेतल्या जातात. सोसायटीतील अन्य लोकांना त्रास होऊ नये. तसेच ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या सभांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन न करण्याचा निर्णय मनीषा पाटील यांनी घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.