Pune : मनोहारी आदिवासी नृत्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज : ‘बिहाईंड द वुड्स’ या ओडिशा आणि पश्चिम बंगाल येथील (Pune) जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांच्या नृत्य महोत्सवाचे आयोजन येरवडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिरात कलिंगा ट्रस्ट आणि ओडिशा सरकारच्या सांस्कृतिक,भाषा आणि साहित्य विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये ओडिशा, प. बंगाल आणि महाराष्ट्र या तीन राज्यांची संस्कृती, परंपरा, लोकनृत्य एकच व्यासपीठावर पाहण्याची संधी पुणेकरांना लाभली. अत्यंत आकर्षक वेशभूषा, रंगभूषा, केशभूषा, विविध अलंकार आणि अनोखी वाद्ये वाजवत सादर झालेल्या लोकनृत्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

भारतीय कला, संस्कृती तसेच आदिवासी संस्कृती, कला, साहित्य याचे जतन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने डॉ. ममता मिश्रा यांनी पुण्यात कलिंगा कला केंद्र ट्रस्टची स्थापना केली असून त्याद्वारे विविध आंतरराज्य सांस्कृतिक देवाण घेवाण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्या निमित्ताने आयोजित ‘बिहाईंड द वुड्स’ हा कार्यक्रम संपन्न झाला.

ओडिशातील कपोई छाऊ नृत्य प्रतिष्ठान व मयूरभंज येथील कलाकारांनी छाऊनृत्य सादर केले. ओडिशातील गंजम येथील उपेंद्रभंजा लोक नृत्य परिषदेच्या कलाकारांनी रोमांचकारी बाघा नृत्य म्हणजेच पुरुष कलावंतांनी रंगभूषेच्या सहाय्याने वाघाचे रूप धारण करून केलेले नृत्य यामध्ये देवी आराधना, दैत्य वध असे प्रसंग नृत्य आणि विविध वाद्यांच्या वादनाने सादर करण्यात आले. प्राची पाणिग्रही आणि ग्रूप ने ओडिशाचे लोकप्रिय संभलपुरी लोकनृत्य सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ओडिशा येथील लोकप्रिय पार्श्वगायिका, आंतरराष्ट्रीय कलाकार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेती अनिंदिता दास यांनी लोकगीते सादर केली. पश्चिम बंगालच्या लोकगीतांमधे भटियाली, गोंभिरा, भवैया, जुमुर आणि बाउल या भक्तीगीताचा समावेश होता.

Mumbai : गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्किट तयार व्हावे – राज्यपाल

प. बंगालचे लोकप्रिय गायक पिपल रे, सागरिका दास, इप्सिता मोहंती आणि इप्सा मोहपात्रा यांनी कर्णमधुर गीते सादर केली. (Pune) नृत्य प्रकारामध्ये ओडिशी नृत्याचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या अर्चना बसू यांनी ओडिसी नृत्य, पौलोमी चटर्जी यांनी प. बंगालचा शास्त्रीय नृत्य प्रकार गौडीयो, अन्वेषा सिंग यांनी उदय शंकर शैलीतील नृत्य आणि सयानी नंदा यांनी कथ्थक नृत्य सादर केले.

ऋतुरंग कल्चरल ग्रुपच्या करुणा पाटील यांनी संस्कृती दर्शन कार्यक्रम सादर केला या मधे आषाढी वारी-विठ्ठल विठ्ठल मंगळागौर खेळ, कोळीनृत्य, गणेशस्तुती आणि घटस्थापना-जोगवा ही महाराष्ट्राची सण परंपरा पुण्यातील स्थानिक कलाकारांनी नृत्यातून सादर केली.

ओडिशाचे माहिती आयोग आयुक्त, आयएएस गुरुप्रसाद मिश्रा, आणि ओडिया भाषा, साहित्य आणि संस्कृती विभाग प्रमुख आयएएस, दिलीप राउतराय तसेच पुण्याच्या आदिवासी संग्रहालय आणि प्रशिक्षण केंद्राच्या सह संचालिका चंचल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या लोकनृत्य महोत्सवात पार्श्वगायिका आनंदिता दास आणि ओडिसी नृत्यांगना अर्चना बसू यांना गुरुप्रसाद मिश्रा आणि दिलीप राउतराय यांच्या हस्ते अनुक्रमे संगिताश्री सन्मान आणि रिटादेवी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. जे. स्वाती यांनी केले. या वेळी कलिंगा कला केंद्र ट्रस्टचे सल्लागार लोकनाथ सारंगी, सचिव संदीप राणा, सभासद निक्षीता सारंगी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.