Pune : नेहमीसारखाच पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन करणार,शिवसेनेचा इशारा

एमपीसी न्यूज – दर गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद करून पुणेकरांवर पाणीकपात लादली आहे. पुण्यात नेहमीसारखाच पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिला आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरण साठ्याच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे शहरात 2 वेळ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही शिवसेनेतर्फे केली आहे. यासंदर्भातील निवेदन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबेल अग्रवाल यांना देण्यात आले आहे.

एक दिवस जर पुणे शहरात पाणीपुरवठा बंद ठेवला तर त्याचा परिणाम शहरातील विविध भागांवर होतो. 2 – 3 दिवस पाणीपुरवठा व्यवस्थित आणि पुरेशा दाबाने होत नाही.

पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. पुण्यातील सर्व धरणे भरून आहेत. धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडावे लागत आहे. दरम्यान, दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी कामे करण्यात येणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. तर, पुणे शहरात दोन वेळ पाणीपुरवठा करायचे झाल्यास धरणांतून 1700 एमएलडी पाणी उचलावे लागणार आहे. जलसंपदा विभाग त्यासाठी परवानगी देत नाही. सध्या महापालिका धरणांतून 1400 एमएलडी दररोज पाणी उचलले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.