Pune : 60 हजार लोकसंख्येच्या प्रभागात 2400 किट कुठे वाटायचे ?

5 लाखात येणार 600 किट ; प्रस्ताव बारगळला

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकट काळात नगरसेवकांच्या ‘स’ यादीतून 5 लाख रुपयांचे अन्नधान्य खरेदी करून नागरिकांना वाटप करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. या 5 लाख रुयांमध्ये 600 किट खरेदी केले जाऊ शकते. महापालिकेचा 1 प्रभाग 4 वॉर्डांचा आहे. त्यामध्ये 2400 किट कोणाला आणि कसे वाटणार, असा प्रश्न नागरसेवकांपुढे निर्माण झाला आहे.

सध्या शासनातर्फेही नागरिकांना रेशनिंग वाटण्यात येत आहे. एका प्रभागात साधारण 60 ते 70 हजार लोकसंख्या असते. त्यामुळे महापालिकेच्यावतीने अन्नधान्य खरेदी करून नागरिकांना वाटप करण्याचा प्रस्ताव प्रस्ताव बारगळला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

तर, दुसरीकडे कोरोना कंटेन्मेंट झोनमध्ये महापालिकेतर्फे घरपोच किट वाटप करण्यात येत आहेत. या भागांत जवळपास 4 लाख लोक आहेत. त्यांना घरपोच किट देणे आव्हानात्मक आहे. त्यासाठी नगरसेवकही आपापल्या प्रभागातील नागरिकांना किट देण्यासाठी मदत करीत आहेत.

याबाबत एका नगरसेवकाने सांगितले की, आपण आतापर्यंत स्वतः जवळचे 30 लाख रुपये खर्च करून किट वाटले. मागील 3 महिन्यांपासून कोरोनाचे संकट पुण्यात निर्माण झाले आहे. आणखी किती दिवस किट वाटणार, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी गोरगरीब नागरिकांना धान्य देण्यासाठी 5 नव्हे तर 10 लाख रुपये खर्च करण्याचे तोंडी आदेश दिले आहे. मात्र, महापालिका आयुक्त आणि महापालिकेतील सत्ताधारी निर्णय घेत नसल्याचे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.