Queen Elizabeth II Passes Away : राणी एलिझाबेथ यांचे निधन

एमपीसी न्यूज – ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ व्दितीय यांचे गुरुवारी रात्री निधन झाले.त्या 96 वर्षांच्या होत्या. एलिझाबेथ यांना वयामुळे प्रवास मर्यादा येत असल्यानेच दोन दिवसांपुर्वी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांना बाल्मोराल कॅसल येथे बोलावून घेतले होते व त्यांच्याकडे पंतप्रधान पदाची सूत्रे सोपविली होती.

बकिंगहॅम पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार राणी गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आरोग्याच्या अनेक समस्यांमधून बर्या झाल्या होत्या. परंतू, त्यांना चालणे आणि उभे राहण्यात अडचणी येत होत्या. त्यातच गुरुवारी त्यांची प्रकृती ढासळल्याचं समोर आलं होतं. विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर राणी वरिष्ठ राजकीय सल्लागारांसह पूर्वनियोजित बैठकीला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.

राणी एलिझाबेथ या स्कॉटलंडमधील त्यांच्या बाल्मोराल कॅसल येथे राहत होत्या. वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. गुरुवारी त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर एलिझाबेथ यांचे पुत्र युवराज चार्ल्स, त्यांच्या पत्नी कॅमिला, नातू राजपुत्र विल्यम हे सर्व बाल्मारोल येथे गेले होते. अखेर गुरुवारी रात्री बकिंगहॅम पॅलेसने राणीचं निधन झाल्याचे जाहीर केले.

सर्वाधिक काळ ब्रिटनच्या राजगादीवर विराजमान असलेली व्यक्ती म्हणजे राणी एलिझाबेथ व्दितीय. राजे  जॉर्ज सहावे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या.1936 मध्ये आठवे एडवर्ड यांनी राजत्याग केल्याने जॉर्ज सहावे यांना राजगादी मिळाली.6 फेब्रुवारी 1952 रोजी जॉर्ज सहावे यांचे निधन झाले.त्यानंतर एलिझाबेथ या गादीवर आल्या. या गादीवर येणार्या त्या सहाव्या स्त्री सम्राझी ठरल्या.20 नोव्हेंबर 1947 मध्ये एलिझाबेथ यांचा विवाह युवराज फिलिप यांच्यासोबत झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.