Pimpri : आठ दिवसाच्या बाळावर दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

एमपीसी न्यूज – डॉ डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल व संशोधन केंद्र, पिंपरी येथे आठ दिवसाच्या बाळावर दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. महिलेची सिझेरीयन प्रसूती करण्यात आली होती. नवजात बाळाला असामान्य जटिल जन्मजात हृदयरोग असल्याचे ऩिष्पन्न झाले. हृदय व शल्यचिकित्सा करणा-या टीमने अतिशय गुंतागुंतीची व जोखीमेची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करुन आठ दिवसाच्या बाळाला जीवनदान दिले.

सखोल वैद्यकीय तपासणीमध्ये नवजात बालकाचे शरीर निळसर पडल्याचे दिसून आले. बाळाला रक्तातुन पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. संतोष जोशी, नवजात बालरोग तज्ज्ञ डॉ.माळवदे यांच्यासह डॉक्टरांच्या टीमद्वारे केलेल्या तपासणीतून असे निदान झाले की, बाळाला असामान्य जटिल जन्मजात हृदयरोग आहे याला या आजाराला “इन्फ्रा कार्डियाक टोटल पल्मोनरी वीनस कनेक्शन” असे म्हणतात. अशा स्थितीत फुफ्फुसातून ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या वरच्या डाव्या कप्प्यात जाण्या ऐवजी ते रक्त यकृताच्या रक्तवाहिनी मध्ये जात होते. त्यामुळे हृदयाचे कार्य व्यवस्थित होत नव्हते या बाळाची प्रकृती अतिशय चिंताजनक होती अश्या गंभीर स्थितीत मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते.

बाळावर तात्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. डॉ. अनुराग गर्ग यांच्या नेतृत्वात खाली हृदय व शल्यचिकित्सा करणा-या टीमने अतिशय गुंतागुंतीची व जोखीमेची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली रुग्णाची ऑक्सिजनयुक्त रक्त वाहिनी हृदयाच्या वरच्या डाव्या कप्प्याकडे वळविण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर बाळाला पाच दिवस (व्हेंटिलेटरवर) जीवनरक्षक प्रणाली वर ठेवण्यात आले होते. त्यानंतर बाळाची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार योग्य रित्या पूर्ण करण्यात येत असून बालकाला त्याच्या आई वडिलांकडे सुपूर्त करण्यात आले आहे.

यामध्ये बालरोग भूल तज्ञ् डॉ. विपुल शर्मा, डॉ. संदीप जुनघरे, आणि हृदय शल्य चिकित्सक डॉ. आशिष डोळस, डॉ. स्मृती हिंदारिया, डॉ. रणजीत पवार व परिचारिका आणि कर्मचारीवर्गाचे या दुर्मिळ अश्या हृदय शस्त्रक्रियेत सहभाग होता.डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल मधील हृदयरोग शल्य चिकित्सा विभागामध्ये उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञान व उत्कृष्ट पायाभूत सेवा सुविधांमुळे आणि तज्ञ् डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे जटिल जन्मजात हृदय रोगाबाबतची दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया पूर्ण करण्यास यश मिळाले” असे मत डॉ अनुराग गर्ग यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.