Pimpri News : जलपर्णी काढण्यासाठी थेट पद्धतीने दिलेल्या कामास स्थगिती देण्याची ‘रयत’ची मागणी

एमपीसी न्यूज – शहरातील इंद्रायणी, पवना, मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी थेट पद्धतीने दिलेल्या कामास तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी रयत विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाच्या नियमावलीचा पालिका अधिका-यांना विसर पडला असून, ठेकेदारांना पोसण्यासाठी पालिका अधिकारी अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोप रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे यांनी केला आहे.

रयत विद्यार्थी परिषदेच्या वतीने याबाबतचे निवेदन महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आले आहे. ‘इंद्रायणी, पवना, मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी आरोग्य विभागामार्फत पूर्वीच्याच ठेकेदारांना पुन्हा काम देण्यात आले आहे. कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट पद्धतीने काम का दिले ? तीन महिन्याच्या कामासाठी 2 कोटी 29 लाख खर्च  अपेक्षित आहे, मात्र याच ठेकेदारांवर आरोग्य विभागाची मेहरबानी का ? आरोग्य विभाग आणि ठेकेदारांचे आर्थिक हितसंबंध जोपासण्याचे काम महानगरपालिका करत आहे.’ असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. महानगरपालिकेने ‘कटिबद्ध जनहिताय’ हे बोधवाक्य बदलून ‘कटिबद्ध ठेकेदार हिताय’ असे करावे असेही या निवेदनात म्हटले आहे.

‘जलपर्णी काढण्यासाठी पूर्वीच्याच ठेकेदारांना काम दिले आहे. थेट पद्धतीने दिलेल्या या कामासाठी निविदा पद्धतीने ठेकेदाराची निवड अपेक्षित होती. मात्र, पालिकेने तसे न करता पूर्वीच्याच ठेकेदारांना काम दिले आहे. पालिकेला शासन नियमांचा विसर पडला असून, ठेकेदारांना पोसण्याचे काम पालिका करत आहे. थेट पद्धतीने नेमलेल्या ठेकेदारांच्या कामास तात्काळ स्थगिती देऊन निविदा प्रक्रिया राबवून जलपर्णी काढण्याचे काम देण्यात यावी.’ अशी आमची मागणी असल्याचे रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.